Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपालांनी शहिदांना चप्पल घालून आदरांजली वाहिल्याने चर्चेला उधाण

चप्पल किंवा जोडे काढणे आवश्यक नाही- राजभवन चे प्रसिध्दी पत्रक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 26 नोव्हेंबर :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आधीच वादात सापडलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी आता शहीदांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलिसांना आदरांजली वाहिली. पण यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून आदरांजली वाहिली. यामुळे हा शहिदांचा अपमान नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांसह इतरही जवान शहीद झाले होते. तसेच अनेक निष्पाप नागरीक ठार झाले होते. मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील पोलीस स्मारकच्या ठिकाणी शहीदांना आज आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी शहीदांना आदरांजली वाहण्यापूर्वी पायातील पादत्राणे काढली. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायातील चप्पल काढली नाही. चप्पल घालूनच राज्यपाल कोश्यारी यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. यामुळे राज्यपालांच्या या कृतीवर आता टीका होत आहे. राज्यपालांनी शहीदांचा अपमान केला आहे, अशी टीका केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यपालांनी पोलीस हुतात्म्यांचा अपमान केला म्हणणे द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे

आज सकाळी माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस स्मारक येथे २६  नोव्हेंबर हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या ठिकाणी चप्पल / जोडे काढणे आवश्यक नाही असे सांगितले.  अलीकडेच राज्यपालांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी भेट दिली होती. त्याठिकाणी देखील हीच पद्धत पाळली जाते. त्यामुळे चप्पल पायात असताना हुतात्म्यांना अभिवादन केल्यामुळे राज्यपालांनी हुतात्म्यांचा अपमान केला असे म्हणणे अतिशय द्वेषपूर्ण आणि खोडसाळपणाचे आहे, असे राजभवनातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आजच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांनी देखील पादत्राणे घालून अभिवादन केले. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ही टीका केली आहे. अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी टीका केली आहे. सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान पोलिस प्रशासनाशी बोलून घेतले असते. 26/11 च्या अभिवादन कार्यक्रमात बूट किंवा चप्पल काढली जात नाही. तशा पद्धतीचे ब्रिफिंग पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त अभिवादन करायला येणार्‍या मान्यवरांना करीत असतात, असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

संविधान दिन साजरा आणि शहिदाना श्रद्धांजली

कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.