डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य, चैत्यभूमीवर उसळला भीमसागर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबरपासून लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करत बाबासाहेबांचे दर्शन घेतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महापालिकेने विविध सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी अनुयायींची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगानेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शौचालयांच्या संख्येतही यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed.