Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

यशने गाठले किलीमांजारो शिखर; आता स्वप्न आहे एव्हरेस्ट गाठण्याचे!

15 ऑगस्टला किलीमांजारोवर फडकविला राष्ट्रध्वज

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशिम, दि. २४ ऑगस्ट : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर निश्चित केलेले ध्येय सहज पुर्ण करता येते, अशाच एका ध्येयाची पुर्तता वाशिम येथील १९ वर्षीय तरुण यश मारोती इंगोले याने आफ्रीका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजारोची १९ हजार ३४१ फुटाची चढाई करुन केली. विशेष म्हणजे ही कामगिरी यशने १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनी किलीमांजारोवर राष्ट्रध्वज फडकवून केली. किलीमांजारो चढण्याचे ध्येय गाठल्यानंतर आता त्याचे स्वप्न जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट गाठण्याचे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाशिम तसा मागास जिल्हा. मोठया प्रमाणात क्रीडा सुविधा उपलब्ध नसतांना तसेच जिल्हयाच्या भौगोलीक क्षेत्रात दऱ्याखोऱ्या, पर्वतरांगा नसतांना देखील यश गिर्यारोहणाची आवड आपल्या वडिलांकडून जोपासत दररोज १० कि.मी. धावणे आणि २० कि.मी. सायकलींग करणे असा यशचा नित्यक्रम झाला आहे. रविवारी तर यश ३० ते ३५ किलोमीटर सायकलींग करतो. वडिलांकडून त्याने गिर्यारोहणाचा छंद जोपासला आहे. आपल्या मुलाने या क्षेत्रात नाव कमाविले पाहिजे, यासाठी वाशिम अर्बन बँकेच्या अमरावती शाखेत कार्यरत असलेले त्याचे वडिल मारोती इंगोले हे देखील हातभार लावत आहे.

यश ५ व्या वर्गात असतांना त्याने पहिला किल्ला सर केला तो औरंगाबादजवळील दौलताबाद किल्ला. एवढेच नव्हे तर सहयाद्री पर्वतरांगेतील तब्बल १८ किल्ले आणि जंजीरा, कुलाबा व सिंधुदुर्ग हे तीन सागरी किल्ले देखील चढाई करुन यशने गाठले. सन २०१८ मध्ये यशने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई गाठले ते हिवाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूत. हे सर्व किल्ले आणि शिखर चढण्यासाठी यशला वडिलांची मोलाची मदत झाली. यश १० वा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने उत्तराखंड राज्यातील बेदिनी बुग्याल हे १४ हजार २०० फुट उंचीचे शिखर देखील गाठले. यशने वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून इलेक्ट्रीकल या विषयातून अभियांत्रिकी पदविका नुकतीच उत्तीर्ण केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गिर्यारोहणाची आवड यशला स्वस्थ बसू देत नव्हती. जगातील सर्वोच्च सात शिखरावर चढाई करण्याचा संकल्प त्याने केला आहे. त्यापैकी किलीमांजारो शिखरावर चढण्याची मोहिम यशने 15 ऑगस्ट रोजी फत्ते केली आहे. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात आपण नाव कमाविले पाहिजे यासाठी त्याने तंत्रशुध्द अभ्यास आणि प्रशिक्षण देखील घेतले आहे. १ जून ते २६ जून २०१९ या कालावधीत हिमाचल प्रदेश सरकारच्या अटल बिहारी वाजपेयी इन्स्टीटयूट ऑफ माउंटनेअरींग ॲन्ड अलाईड स्पोर्ट या प्रशिक्षण संस्थेत त्याने प्रशिक्षण पुर्ण केले आहे. प्रशिक्षण काळात त्याला रॉक क्लायमिंग, वॉल क्लायमिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॅपलींग व झुमाईंगसह अन्य बाबींचे प्रशिक्षण मिळाले. हे प्रशिक्षण यशने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.

आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील किलीमांजारो हे सर्वोच्च शिखर १५ ऑगस्ट रोजी गाठण्यासाठी वाशिमचे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांचे यशला पाठबळ मिळाले. त्यांनी केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर त्यांनी विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना आवाहन करुन जवळपास १ लक्ष ७० हजार रुपये निधी गोळा करुन दिला. त्यामुळेच किलीमांजारो शिखर गाठण्याचे ध्येय साध्य करता आल्याचे यशने सांगितले.

किलीमांजारो शिखर गाठण्यासाठी आलेल्या अनुभवाबाबत बोलतांना यश म्हणाला की,किलीमांजारो हे जगातील एकमेव असे शिखर आहे की, त्याच्या आजूबाजुला कोणतेही पर्वतरांगा नाही. किलीमांजारोसाठी ८ ऑगस्टला वाशिम येथून नागपूरला पोहचलो. ९ ऑगस्टला सकाळी नागपूरवरुन दिल्लीसाठी विमानाने निघालो. रात्री १० वाजता दिल्ली विमानतळावरुन दोहा (कतार) ला रात्री ११:३० वाजता पोहचलो. दोहा येथून विमानाने रात्री ०१:३० वाजता निघाल्यानंतर टांझानिया देशातील किलीमांजारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे ६:३० वाजता पोहचलो. तेथून काही अंतरावर असलेल्या मोशी येथे पोहचल्यानंतर किलीमांजारो शिखरावर चढण्यासाठी उपलब्ध असलेल्या नऊ मार्गापैकी मरंगू या प्रवेशव्दाराची यशने निवड केली. याच मार्गावरुन किलीमांजारो शिखरावर पहिला गिर्यारोहक पोहोचला होता. त्यामुळे याच मार्गाची निवड केल्याचे यशने सांगितले.

११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मरंगू प्रवेशव्दारातून किलीमांजारो शिखराकडे चढाईला सुरुवात केली. सोबतीला भोपाळच्या गिर्यारोहक श्रीमती ज्योती रातळे (वय ५२ वर्ष) व पुण्याच्या स्मीता घुगे (वय ३१ वर्ष), आम्हा तिघांच्या मागे आणि पुढे प्रत्येकी एक गाईड आणि एक स्वयंपाकी आणि तीन त्याचे सहकारी होते. सायंकाळी 6 वाजता मंदारा हट येथे पोहचलो. मंदारा हटपर्यंतचे ८८७५ फुट अंतर आम्ही पुर्ण केले. त्यानंतर अत्यंत घनदाट जंगलातून किलीमांजारोच्या दिशेने चढाईला सुरुवात झाली. होरोंबो हटपर्यंत १२२०० फुट अंतरावर पोहचलो. वातावरणाशी एकरुप होण्यासाठी होरोंबो येथेच रात्रीला मुक्काम केल्यानंतर १४ ऑगस्टला सकाळी ७ वाजता किलीमांजारोच्या दिशेने निघाल्यानंतर दुपारी २ वाजता किबोहट या ठिकाणी पोहचलो. आतापर्यंत १५५०० फुट उंचीची चढाई आम्ही पुर्ण केली. किबोहटला पोहचल्यानंतर तेथील तापमान उने १८ अंश सेल्सीअस होते. तेथे जेवण करुन आराम केला.

१४ ऑगस्टच्या रात्री १२:३० वाजता पुन्हा किलीमांजारोच्या दिशेने निघालो. रात्रभर आम्ही सतत चालत होतो. थोडेही लक्ष विचलीत झाले की मृत्यू हा निश्चितच असल्याचे बाजूच्या खोल दरीवरुन आम्हाला दिसत होता. वारे २० ते २५ प्रति किलोमीटर वेगाने वाहत होते. अंग गोठविणाऱ्या थंडीतून किलीमांजारोच्या दिशेने वाटचाल सुरु होती. आता चढाई तर ८० डिग्रीच्या कोनातून सुरु होती. थेट चढाव असल्यामुळे चालणे कठीण जात होते. जेवढे उंचावर जावे तेवढे प्राणवायुचे प्रमाण कमी होत होते. रात्रभर चालत राहून १५ ऑगस्टला सकाळी ९ वाजता किलीमांजारो हे सर्वोच्च शिखर सर केले. कारण तो दिवस होता १५ ऑगस्ट. याच दिवशी तेथे पोहचून भारतीय तिरंगा मोठया अभिमानाने किलीमांजारोच्या सर्वोच्च ठिकाणी फडकविल्याचा आनंद गगनात मावत नव्हता.असे यशने अभिमानाने सांगितले.

जवळपास तीन तास यशने किलीमांजारो शिखरावर घालविले. हे शिखर गाठण्यासाठी अंगात उने 25, उने 15, उने 5 आणि उने शुन्य तापमान सहन करेल अशा प्रकारचे 5 जॅकेट एकावर एक अंगावर घातली. बॉडी थर्मल हाफ टि-शर्ट व फुल टी-शर्ट देखील घालून चढाई केली. दोन हायकींग पोल, गॉगल, 3 सॉक्सचे जोड पायामध्ये घालून उत्तम प्रकारच्या कंपनीच्या बुटाचा चढाईसाठी वापर केला. 16 ऑगस्टला सकाळी 7 वाजता मरंगू प्रवेशव्दारावर पोहचून किलीमांजारोची मोहिम फत्ते केल्याचे सांगितले.

हिमाचल प्रदेश सरकारच्या प्रशिक्षण संस्थेत घेतलेल्या प्रशिक्षणामुळे व राज्यातील कळसुबाई शिखर आणि अन्य किल्ले चढल्यामुळे किलीमांजारो शिखर गाठता आल्याचे यश म्हणाला. किलीमांजारो शिखर चढण्याचा हा अनुभव आणि मिळालेल्या प्रशिक्षणामुळे जगातील उर्वरित ५ व एव्हरेस्ट हा जगातील सर्वोच्च शिखर गाठण्याचे आता आपले स्वप्न असल्याचे यश म्हणाला.

हे देखील वाचा,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य,नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश

जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांना निरोप,गडचिरोली जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी संजय मीना रूजू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.