देशरक्षणासाठी गडचिरोलीच्या सुपुत्राचे सर्वोच्च बलिदान; बीएसएफ जवान सुरेश आंबडर शहीद
भारत-बांगलादेश सीमेवरील घुसखोरीविरोधी मोहिमेत वीरमरण; कुरखेडा तालुक्यावर शोककळा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशाच्या सीमा अभेद्य राखण्याच्या पवित्र कर्तव्यात असताना गडचिरोली जिल्ह्याच्या आणखी एका सुपुत्राने मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी तथा सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान सुरेश दुर्गु आंबडर (वय 35) यांना पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान 23 जुलै रोजी वीरमरण आले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांसह सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अत्याधुनिक स्मार्ट फेन्सिंग, रडार यंत्रणा, स्पीड बोटी तसेच सुंदरबनसारख्या दुर्गम आणि संवेदनशील भागात फ्लोटिंग सीमा चौक्यांच्या माध्यमातून चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान संशयित घुसखोरांकडून झालेल्या गोळीबारात जवान सुरेश आंबडर गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी हलविले; मात्र उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरेश आंबडर यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर सीमा सुरक्षा दलात स्थान मिळवले होते. अवघी सुमारे 70 घरे आणि सुमारे 300 लोकसंख्या असलेल्या मरारटोला या छोट्याशा गावातून त्यांनी देशसेवेचे स्वप्न साकार केले. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि धाडसी जवान म्हणून त्यांनी सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या वीरमरणामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मरारटोला गावासह कुरखेडा तालुक्यात शोकाचे वातावरण आहे. गावातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गृह मंत्रालयाकडून शहीद झाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन शहीद जवानांच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात असून त्यांचे पार्थिव लवकरच मूळ गावी आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

