Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील समस्यां विरोधात कुणबी सेना युवादल मैदानात..

८ दिवसांत योग्य त्या उपाय योजना करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

प्रतिनिधी: मनोज सातवी 

पालघर, दि. ९ सप्टेंबर : मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी पडलेल्या मोठ मोठया खड्डयांमुळे, तसेच अपघाती क्षेत्रांवर (ब्लॅक स्पॉट) सूचना फलक न लावल्यामुळे, रस्ता दुभाजक किंवा उड्डाणपुलाच्या अभावी शेकडो निरपराध लोकांचे बळी जात आह या विरोधात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी आवाज उठवून देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) किंवा या महामार्गाच्या देखभाल करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे या प्रश्नावर आता कुणबी सेना युवादलाने आक्रमक भूमिका घेत ८ दिवसांत योग्य त्या उपाय योजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन कुणबी सेना युवादलाकडून पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशाच्या राजधानीला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा एक अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच या अगोदर महामार्गाचे व्यवस्थापन करणारी आय आर बी कंपनी आणि सद्यस्थितीत महामार्गाची देखभाल दुरुस्ती तसेच टोळ व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदार कंपन्या या सर्वांच्या ढिसाळ आणि तकलादू कामांमुळे हा महामार्ग एक मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या विरोधात आता कुणबी सेना रस्त्यावर उतरली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आठ दिवसांत महामार्गावरील समस्यांचे निराकरण करा अन्यथा कुणबी सेना करणार रास्ता रोको

मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांसह इतर समस्या संदर्भात स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, असून पुढील ८ दिवसांमध्ये कुणबी सेनेने निवेदनात नमूद केलेल्या समस्यांचे निराकरण झाले नाही तर, ८ दिवसा नंतर कुठलीही पूर्व सूचना न देता कुणबी सेनेच्या माध्यमातून कुणबी सेनाप्रमुख श्री. विश्वनाथ पाटील आणि पालघर जिल्हाप्रमुख श्री अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुणबी सेना युवा दलाकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

टोल वसुलीची वाढीव मुदत संपूनही १०० टक्के टोल वसुली, दुरुस्तीच्या नावाने मात्र बोंबाबोंब

विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते कर आकारणीची (टोल वसुलीची) वाढीव मुदत संपूनही सर्व वाहनांकडून बेकायदेशीरपणे १०० टक्के टोल वसुली सुरू आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. जर टोल वसुली शंभर टक्के केली जात असेल तर त्या प्रमाणात नागरिकांना सुविधा देणे देखील अपेक्षित आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तसेच इतर अनेक प्रश्नांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा सह कंत्राटदार देखील मूग गिळून गप्प आहेत.

राजकीय पक्षांची आंदोलने सेटिंग पुरतीच का ?

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत आणि अवैध टोल वसुली बाबत कोणतेच सोयर सुतक नाही असेच दिसते. कारण, काही दिवसांपूर्वी येथील लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले मात्र महामार्गावरील खड्डे आणि इतर समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे टोल वसुलीच्या नव्या कंत्राटदार किंवा नव्या टोल वेवस्थपनसोबत सेटिंग करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखवण्यापुरतीच हे आंदोलने होती का ? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे प्रशासनाला आली जाग मात्र कारवाई शून्य

महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वरई नाका येथील पुलावर खड्डा चुकवत असताना ३० ऑगस्ट रोजी प्रिया रविंद्र पवार या हालोली गावातील २५ वर्षीय तरुणीची बळी गेला, असे रोज बळी जातात मात्र याबाबत प्रशासन कधीच गांभीर्य दाखवत नाही. परंतु गेल्या आठवड्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या चारोटी नाक्याजवळ झालेल्या अपघाती निधनानंतर या महामार्गाच्या समस्यांबद्दल माध्यमांपासून ते केंद्र सरकारपर्यंत दखल घेण्यात आली. परंतु उपाययोजनांच्या नावाने मात्र प्रशासनाकडून बोंबच आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीला ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी साधे अपघाती क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) सूचना फलक देखील अद्याप लावण्यात आलेले नाही.

कुणबी सेनेच्या वतीने या महामार्गावरील खड्ड्यांसह इतर समस्यांबाबत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यावर आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुणबी सेना युवा दलामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी पालघर तालुका कुणबी सेना युवा दल प्रमुख प्रशांत सातवी यांच्यासह राजु पाटील, प्रितम पाटील, अमेय पाटील, दिपेश पाटील, योगेश पाटील, जयेश पाटील, धिरज पाटील, विपुल सातवी, भावेश घरत, प्रकाश शेलार, गणेश नाईक, गौरांग पाटील, गौरव कंडी, पंढरी पाटील, मंथन पाटील,आकाश पाटील, हार्दिक पाटील, जिग्नेश शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.