Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत राजकीय वरदहस्तालाही चाप : अनधिकृत इमारतीवर बुलडोझर

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अनधिकृत इमारत अखेर अहेरी नगरपंचायतीने जमीनदोस्त केली. न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत संपताच आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने थेट बुलडोझर चालवत कारवाई केली.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी : राजकीय दबाव, नियमांकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आणि न्यायालयीन आदेशांनाही न जुमानता उभारण्यात आलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अनधिकृत इमारत अखेर अहेरी नगरपंचायतीने जमीनदोस्त केली. न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत संपताच आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने थेट बुलडोझर चालवत कारवाई केली.

गडअहेरी मार्गालगत कंकडालवार यांनी भूखंड खरेदी करून इमारत उभारण्यास सुरुवात केली होती. बांधकाम परवानगीसाठी नगरपंचायतीकडे सादर करण्यात आलेला नकाशा राज्य महामार्गापासून आवश्यक असलेले २० मीटर अंतर तसेच रस्त्याच्या हद्दीपासून किमान ४.५० मीटर अंतर न सोडल्यामुळे सुरुवातीलाच नाकारण्यात आला होता. मात्र, स्पष्ट नकार असूनही बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याने प्रशासन आणि कायद्यालाच आव्हान देण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नगरपंचायतीने अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश दिल्यानंतर कंकडालवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र २९ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने नगरपंचायतीची भूमिका योग्य ठरवत कंकडालवार यांच्याविरोधात स्पष्ट निकाल दिला. वरिष्ठ न्यायालयात अपीलसाठी दिलेली मुदतही संपून कोणतीही स्थगिती न मिळाल्याने अखेर आज कारवाई अटळ ठरली.

संभाव्य तणाव लक्षात घेता अहेरी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता कारवाई पूर्ण करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनधिकृत बांधकामावर, व्यक्ती कितीही राजकीयदृष्ट्या प्रभावी असली तरी, अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.