Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परिचारिकेच्या धाडसाने टळला मृत्यू…वडसा ग्रामीण रुग्णालयात थरारक घटना; तत्काळ CPR मुळे हृदय थांबलेली माता पुन्हा जीवनाच्या प्रवाहात…

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याकडून परिचारिका कवितांचे विशेष कौतुक....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. १३ जून: वडसा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर अचानक गंभीर अवस्थेत गेलेल्या मातेचे प्राण कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या प्रसंगावधानामुळे वाचले. “वेळ थांबत नाही, पण निर्णयाचा क्षण थांबू नये” याची जाणीव करून देणाऱ्या या घटनेत हृदयाचे ठोके थांबलेल्या रुग्णाला तात्काळ CPR देऊन पुन्हा जीवन मिळवून देण्यात आले. या धाडसी आणि तातडीच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य माता मृत्यू टळला असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

वडसा ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेची सिझेरियन (LSCS) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी संबंधित मातेची प्रकृती अचानक खालावली. तिला तीव्र झटके (Convulsions) आले आणि काही क्षणांतच तिचे श्वासोच्छ्वास व हृदयाचे ठोके थांबले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अत्यंत गंभीर आणि जीवन-मरणाच्या परिस्थितीत कर्तव्यावर असलेल्या परिचारिका कविता यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ CPR (Cardiopulmonary Resuscitation) सुरू केले. त्यांच्या जलद, अचूक आणि कौशल्यपूर्ण हस्तक्षेपामुळे रुग्णाला हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आणि तिची प्रकृती स्थिर होऊ लागली.

त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिसार आणि डॉ. हीना यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी परिचारिका कविता यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “वडसा ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन सेवा सुरू होणे ही मोठी उपलब्धी आहे. मात्र परिचारिका कवितांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि तत्परता अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे एका मातेला नवे जीवन मिळाले आहे. अशा समर्पित कर्मचाऱ्यांमुळेच शासकीय आरोग्य सेवेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो.”

सध्या संबंधित मातेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.