Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पिक्चर पोस्टकार्डचे विमोचन

ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पातील वन्यजीवांचा समावेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपूर मुख्य पोस्ट ऑफिसतर्फे पिक्चर पोस्टकार्डचे विमोचन करण्यात आले. विशेष म्हणजे जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा प्रकल्पातील दुर्मिळ वन्यजीवांचा या पोस्टकार्डमध्ये समावेश आहे.

मुख्य पोस्ट ऑफिस येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे मुख्य वनसरंक्षक प्रकाश लोणकर, ताडोबा बफर झोनचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिक्षक सी.व्ही. रामीरेड्डी, वरिष्ठ पोस्ट मास्टर चंदू जिवणे, पोस्ट निरीक्षक ठावरी, सहाय्यक अधिक्षक आशिष बनसोड, रोहन आपेट आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मुख्य वनसंरक्षक लोणकर म्हणाले, चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर वन आणि वन्यजीव संदर्भात प्रसिध्द आहे. त्यातच येथील ताडोबा – अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पाला जगमान्यता असून येथील नागरिकांनी वनांचे संरक्षण केले आहे. आज जागतिक वसुंधरा दिन आहे. वनांचे संरक्षण केले तरच आपल्या वसुंधरेचे संरक्षण होईल. वन, पर्यावरण, वन्यजीव आदींच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ वन विभागाचीच नाही तर ती आपल्या प्रत्येकाची आहे. ही जबाबदारी ओळखून मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयाने ताडोबातील वन्यजीवांचा समावेश असलेल्या पोस्टकार्डचे विमोचन करून वसुंधरा संवर्धनात एक पाऊल टाकले आहे. या पिक्चर पोस्टकार्डच्या माध्यमातून ताडोबातील दुर्मिळ प्रजाती इतरत्र माहित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपसंचालक गुरुप्रसाद म्हणाले, पोस्ट विभागाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. जंगलाचे महत्व सर्वांनाच माहित आहे. गत दोन तीन दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान जगात सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. तसेच प्रदुषणही येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्याच्या पिढीसाठी पर्यावरण आणि जंगलांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घराजवळ दोन झाडे लावून त्याचे संवर्धन केले तरी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवू शकतो, असे त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर पोस्टऑफिसचे वरीष्ठ अधिक्षक रामीरेड्डी म्हणाले, मुंबई पोस्ट ऑफिसच्या प्रमुख विना श्रीनिवास यांनी दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथे भेट होती. यावेळी त्यांनी ताडोबातील दुर्मिळ वन्यजीवांवर आधारीत पोस्ट कार्ड काढण्याची सुचना केली. त्यानुसार पक्षी, प्राणी, सुक्ष्म किटक आदींवर आधारीत हे पिक्चर पोस्ट कार्ड तयार करण्यात आले आहे. येथील जैवविविधता इतर ठिकाणी माहिती व्हावी, या उद्देशाने एक हजार पोस्टकार्ड देशातील इतर पोस्ट ऑफिसमध्ये पाठविण्यात येतील. त्यामुळे पर्यटनवाढीस मदत होईल.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पिक्चर पोस्टकार्डचे विमोचन करण्यात आले. संचालन सुजित आकोटकर यांनी तर आभार आशिष बनसोड यांनी मानले. कार्यक्रमाला व्यवस्थापक अभय किरटे, मनिष ठवकर,  भस्मे यांच्यासह कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर द्वारा ४५ वा राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा

गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल – संजय मीणा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.