Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या मोहिमेतंर्गत शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड

24 एप्रिल ते 1 मे दरम्यान विशेष मोहीम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. 22 एप्रिल:  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याकरीता ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येतील. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकर्स प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी नाबार्डचे जिल्हा प्रबंधक तृणाल फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, आरबीआयचे अभिनय कुमार, जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे आदी उपस्थित होते.

राज्यात पी.एम. किसान नोंदणीकृत एकूण 114.93 लाख लाभार्थ्यांपैकी 81.36 लाख लाभार्थी किसान क्रेडिट कार्डधारक आहेत. राज्यात जवळपास 33.57 लाख पी. एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्डधारक नाहीत. यासाठी दि. 24 एप्रिल 2022 रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पी.एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली असून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करावयाची आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सदर मोहीम राबविण्यात येईल.
संबंधित सर्व बँका किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन दि. 1 मे 2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील. यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याचे आणि पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्यासाठी सनियंत्रण करावे, असे निर्देश या मोहिमेअंतर्गत दिले आहेत.

या अनुषंगाने किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्याचे विमोचन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर द्वारा ४५ वा राष्ट्रीय जनसंपर्क दिन साजरा

उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

 

 

Comments are closed.