Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विक्रमगड तालूक्यातील शिंपीपाडा, सुकसाळ भागातील बीजकेंद्रावर मत्स्यविभागाची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर, दि. 16 डिसेंबर: सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पालघर कार्यालयातील तपासणी अधिकारी पथकाने स्थानिक पोलीस विभागाच्या मदतीने विक्रमगड तालूक्यातील धडक कारवाई केली. विक्रमगड तालूक्यातील शिंपीपाडा , सुकसाळ भागातील कुलदिप पाटील रा. शिंपीपाडा- सुकसाळ, ता. विक्रमगड , आजिम खान सईद अख्तर रा. माहीम , मुंबई व गुलाम शेख, रा. जोगेश्वरी यांच्या मदतीने गेल्या काही दिवसांपासून चालू असलेले प्रतिबंधीत मागूर माशांचे प्रजनन केंद्र व मागूर मत्स्यसाठा नष्ट केला व प्रतिबंधीत मागूर प्रजनन करणा-या संबधीत कुलदीप पाटील ,आजिम खान सईद अख्तर यांच्यावर भारतीय दंड विधान 188 व 34 अंतर्गत पोलीस कारवाई दाखल करण्यात आली आहे.

आजिम खान सईद अख्तर, राहाणार माहीम , मुंबई व गुलाम शेख रा. जोगेश्वरी , मुंबई हे दोघे स्थानिक कुलदीप पाटील , रा. शिंपीपाडा- सुकसाळ , ता. विक्रमगड यांच्या रहात्या घराशेजारील जागेत पॉल्ट्री शेडच्या बाजूला प्रतिबंधीत मागूर माशांचे प्रजनन व संवर्धन करत असल्याबाबतची गुप्त तक्रार दिनांक 13/12/2020 रोजी रात्रौ 11.00 वाजता प्राप्त झाल्यानुसार सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पालघर यांनी तात्काळ प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय , मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयातील मत्स्यव्यवसाय अधिका-यांचे एक पथक स्थापन करून विक्रमगड येथील पोलीस विभागाचे सहकार्य घेवून धडक कारवाई करून शिंपीपाडा- सुकसाळ येथिल प्रतिबंधीत मागूर माशांचे बीज केंद्रातील 100 कि.ग्रॅ मागूर मासळी प्रजनक व सुमारे 10 ते 12 लाख मागूर माशांची प्रजनन केलेली अंडी नष्ट करण्यात आली व मागूर माशांचे केंद्र बंद पाडण्यात आले. तसेच कुलदीप पाटील, आजिम खान सईद अख्तर व गुलाम शेख यांच्यावर भा.द.वि. 188 व 34 अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष कारवाईत , आनंद दत्तात्रय पालव, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय , ठाणे-पालघर, दिनेश हंसराज पाटील मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ठाणे-पालघर, सुरेंद्र गावडे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, संदीप जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी , पोलीस हवालदार एस व्हि मोरे , महावीर जगताप वाहन चालक , श्महाले शिपाई. हे उपस्थित होते.

प्रतिबंधीत मागूर माशांचे संवर्धन ही जिल्ह्याकरीता अत्यंत डोकेदुखीची समस्या असून Exotic Magur (Clarius gariepinus) या माशांचे मत्स्यसंवर्धन करतांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळी/मेंढी, गाई , म्हैशी यांचे मांस खादय म्हणून वापरले जाते.व यामुळे पर्यावरणाचा –हास होत असल्याचे आढळून येते. तसेच हा मासा अतिशय मांसभक्षक असल्यामुळे इतर माशांचे मत्स्यपालन करण्यात क्रियाशिल व अधिकृत मासेमारी व्यवसाय करणा-या मत्स्यकास्तकारांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच संवर्धन करण्यात येणा-या माशांना हे मासे मोठया प्रमाणात भक्षण करत असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात तलाव /जलाशयातील पारंपारीक मासे जसे कटला, रोहू ,मृगल व सायप्रिनस इत्यादींच्या संख्येत मोठया प्रमाणात परीणाम होत असल्याचे दिसत आहे. भारतीय प्रजातींना या माशांमुळे धोका निर्माण होत असून सदर जातीच्या माशांचे प्रजनन,संवर्धन ,विक्रि व वहातुकीवर बंदी घातली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Original Application No.381 of 2018 याचिकेच्या दिनांक 22/01/2019 रोजीच्या पारीत केलेल्या आदेशानुसार . राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांनी मागूर माशांच्या Exotic Magur (Clarius gariepinus) प्रजनन व मत्स्यपालन करण्यावर बंदी घातली असून या प्रतिबंधीत मागूर माशांचे संवर्धन व अस्तीत्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिका-यांसमावेत पथक तयार करून मागूर माशांचे संवर्धन होत असलेल्या मत्स्यतळी /तळयांची पहाणी करून व अशा प्रतिबंधीत माशांचे संवर्धन होत असल्यास सदर मत्स्यसाठा नष्ट करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने सदरची धडक मोहीम राबवून सदरचे मागूर मत्स्यबीज केंद्र नष्ट केले आहे. तसेच यापुर्वी दिनांक 10/12/2020 रोजी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत मौजे कुंभारशिव ता. भिवंडी येथील वन विभागाच्या वनक्षेत्रात, वनपट्टयातील जागेत प्रतिबंधीत मागूर माशांचे संवर्धन करणा-या अनधिकृत संवर्धकांना नोटीस बजावणी करण्यात आली असून मागूर संवर्धन करणा-या व्यक्तींवर भा.द.वि. 188 व 34 अंतर्गत कठोर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.तसेच विहीत पद्धतीने मागूर मत्स्यसाठे नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरत्र आढळून येणा-या प्रतिबंधीत मागूर मासळीच्या मत्स्यसंवर्धन व साठे तसेच बीज केंद्रावर ही याचप्रमाणे धडक कार्यवाही राबवण्यात येणार आहे.

Comments are closed.