Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघोलीच्या जमिनीबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर होणार?

भूसंपादनावर तीन तास खडाजंगी चर्चा; संमतीशिवाय पुढील प्रक्रिया नाही, योग्य मोबदल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : पोलाद प्रकल्पांसाठी प्रस्तावित भूसंपादनामुळे वाघोलीतील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रशासनाने थेट संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शेतकरी व स्थानिक रहिवाशांशी तब्बल तीन तास चर्चा करून त्यांच्या हरकती, शंका आणि मागण्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया केली जाईल, तसेच संपादित जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पोलाद प्रकल्पांसाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर वाघोलीतील शेतकऱ्यांच्या मनातील अनेक प्रश्न बैठकीत पुढे आले. जमीन जाणार का? भूसंपादनाची प्रक्रिया नेमकी कशी होणार? मोबदला किती मिळणार? शेतकऱ्यांच्या हरकतींचे काय होणार? अशा विविध मुद्द्यांवर समितीसमोर शेतकऱ्यांनी भूमिका मांडली. प्रशासनाने त्यांच्या शंकांचे म्हणणे ऐकून घेत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५ नोव्हेंबर रोजी नागपुरात झालेल्या बैठकीतील निर्देशानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १४ नोव्हेंबर रोजी समिती गठित केली आहे. बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी, हरकती आणि मागण्या जाणून घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.

‘संवादातूनच प्रश्न सोडवू’…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भूसंपादनाची प्रक्रिया शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढे नेली जाईल. त्यांच्या संमतीला महत्त्व दिले जाईल आणि संपादित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या आणि समस्या कायदेशीर मार्गाने प्रशासनासमोर मांडाव्यात, असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. रस्ते अडविणे अथवा कायदा हातात घेण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवावेत. आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला अहेरीचे अपर जिल्हाधिकारी संजय आसोले, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मुद्रांक जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख विजय भालेराव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री. गिरी यांच्यासह समितीतील अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.