Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंगणवाडीतील शिक्षणाला मिळणार नवी दिशा; गडचिरोलीत १६ कोटींचा प्रकल्प

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील बालकांच्या शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी अंगणवाडी शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याची तयारी सुरू झाली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद, गडचिरोली आणि क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) यांच्यात तीन वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, या प्रस्तावित प्रकल्पासाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून प्रस्तावित असलेल्या ‘गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा यंत्रणेद्वारे पूर्व बाल्यावस्थेतील शिक्षणाचे बळकटीकरण’ या प्रकल्पातून अंगणवाडीतील शिक्षण पद्धती अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे. बालकांच्या सुरुवातीच्या शैक्षणिक टप्प्यातच त्यांना दर्जेदार शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे, हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुर्गम भागातील बालकांवर विशेष भर…

गडचिरोलीच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करता अंगणवाडी शिक्षणाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी शिक्षण व्यवस्थेला बळकटी दिली जाणार आहे. विशेषतः दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांना गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी विविध स्तरांवर काम केले जाणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या उपक्रमामुळे अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यास पुढील शालेय शिक्षणासाठी बालकांची तयारी अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.

टाटा ट्रस्ट्ससह भागीदारांकडून निधी…

या प्रकल्पासाठी टाटा ट्रस्ट्स, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी तसेच अन्य बाह्य भागीदारांच्या माध्यमातून निधी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निधीची उपलब्धता आणि शासनाच्या प्रचलित नियमांच्या अधीन राहून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सहमती दर्शविली आहे.

प्रकल्पाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असून, दोन वर्षांनंतर त्याच्या प्रत्यक्ष फलनिष्पत्तीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून अंगणवाडी शिक्षण व्यवस्थेत नेमका किती गुणात्मक बदल झाला, याचेही मूल्यमापन करता येणार आहे.

गडचिरोलीतील बालकांच्या शैक्षणिक वाटचालीचा पाया अंगणवाडीच्या पातळीवरच अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.