Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा बुडून मृत्यू; एकाची थरारक सुटका,

कुरखेड्यातील हृदयद्रावक दुर्घटनेने गाव शोकसागरात तर पुराडा पोलिसांकडून पंचनामा व तपास सुरू..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे शनिवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत सती नदीने तीन निष्पाप चिमुकल्यांचे जीव घेतले. आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुदैवाने बचावला. या दुर्घटनेने खेडेगावसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान चार विद्यार्थी सती नदीवर आंघोळीसाठी गेले होते. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही प्रवाहात ओढले गेले. त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेत एक विद्यार्थी थोडक्यात बचावला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच स्थानिक शोध पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६ वर्षे), कुणाल रमेश दूधकवर (वय ५ वर्षे) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११ वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला. तिन्ही विद्यार्थी हे रा. खेडेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथील रहिवासी होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकाच गावातील तीन चिमुकल्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण खेडेगावावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे पालकांसह परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन; निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो…

या हृदयद्रावक दुर्घटनेबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तीव्र दुःख व्यक्त करत नागरिकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे, तलाव, बंधारे तसेच खाणींमधील पाणीसाठ्याची पातळी धोकादायकरीत्या वाढली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आंघोळ, पोहणे, सेल्फी काढणे किंवा अनावश्यक वावर पूर्णपणे टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

विशेषतः पालकांनी आपल्या लहान मुलांवर बारकाईने लक्ष ठेवावे, त्यांना नदी, नाले किंवा इतर जलस्रोतांच्या परिसरात एकटे जाऊ देऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या जात असतानाही काहीजण त्या दुर्लक्षित करतात. अशा निष्काळजीपणाची किंमत अनेकदा निरपराध जीवांना मोजावी लागते.

आज कुरखेडा तालुक्यात घडलेली तीन चिमुकल्यांची दुर्दैवी मृत्यूची घटना ही प्रत्येक पालक, नागरिक आणि समाजासाठी गंभीर इशारा आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज अनेकदा येत नाही. त्यामुळे क्षणिक दुर्लक्षही अपरिमित दुःखाला कारणीभूत ठरू शकते. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे, धोकादायक जलस्रोतांपासून सुरक्षित अंतर राखणे आणि लहान मुलांवर सतत देखरेख ठेवणे, हीच अशा दुर्घटना टाळण्याची सर्वात प्रभावी खबरदारी असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.