Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासीबहुल गडचिरोलीतील शिक्षणाचा ‘ग्राउंड रिपोर्ट’!

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचा दुर्गम शाळांना प्रत्यक्ष भेटी देत आढावा...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने आता प्रत्यक्ष शाळांपर्यंत पोहोचून शिक्षणव्यवस्थेचा आढावा घेण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी जिल्ह्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देत शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि विविध शासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे दुर्गम भागातील शाळांमधील प्रत्यक्ष परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेले प्रयत्न यांना राज्यस्तरीय शिक्षण विभागाच्या पातळीवर थेट व्यासपीठ मिळाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग डॉ. माधुरी सावकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उजागरे, DIETचे प्राचार्य धनंजय चाफाळे, गटविकास अधिकारी दुबे, गटशिक्षणाधिकारी परसा मॅडम यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निमगावच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी…

आयुक्त सिंह यांनी जिल्हा परिषद शाळा, निमगाव येथे भेट देऊन शैक्षणिक उपक्रम, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच शाळेतील विविध सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.

यानंतर मॉडेल स्कूल, मोहली येथे भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शिक्षणातील सातत्य, गुणवत्तावाढ आणि भविष्यातील शैक्षणिक व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आधारपासून APAAR IDपर्यंत योजनांचा आढावा…

शिक्षण विभाग, पंचायत समिती धानोरा अंतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण, APAAR ID, विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण परिषद तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील एकही विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहू नये, तसेच शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

गुणवत्ता’ केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे निर्देश…

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक शाळेने नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवा ओळखून त्यावर उपाययोजना कराव्यात आणि शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मार्गदर्शन शिक्षण आयुक्तांनी केले.

आदिवासीबहुल गडचिरोलीतील दुर्गम शाळांना राज्याच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि शैक्षणिक व्यवस्थेचा तळागाळापर्यंत जाऊन आढावा घेणे, हे जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.