शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याचा परिणाम; सोलर पंपाचे साहित्य शेतकऱ्यांच्या दारात!
सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; पेंदाम यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विद्युत विभागाची तातडीची कार्यवाही..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुलचेरा : मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांनी शासनाच्या सौर कृषी पंप योजनेत आपल्या वाट्याची अग्रीम रक्कम भरूनही तब्बल सहा महिन्यांपासून सोलर पंपाच्या प्रतीक्षेत राहावे लागत होते. विद्युत विभागाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती. अखेर शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची प्रशासनाने दखल घेतली असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपाचे साहित्य पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची मोठी अडचण भेडसावत असताना सौर कृषी पंप मंजूर होऊनही प्रत्यक्ष बसविण्यास विलंब होत असल्याचा मुद्दा शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी लावून धरला होता. यासंदर्भात त्यांनी आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देऊन पात्र लाभार्थ्यांच्या शेतात तातडीने सोलर पंप बसवून देण्याची मागणी केली होती.
फेब्रुवारी महिन्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाकडे आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा केली होती. मात्र रक्कम भरूनही प्रत्यक्ष सोलर पंप बसविण्यात न आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागत होता. शासनाकडून पैसे भरून घेऊनही पंपासाठी सहा-सहा महिने प्रतीक्षा का?, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाने उपस्थित केला होता.
विद्युत विभागाने तातडीने कार्यवाही करून सोलर पंप बसविले नाहीत, तर आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भाई चिरंजीव पेंदाम यांनी दिला होता.
या इशाऱ्यानंतर विद्युत विभागाने हालचाली सुरू केल्या असून अहेरी उपविभागातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपाचे साहित्य पोहोचविण्यात आले आहे. आता लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसविण्याची कार्यवाही होणार असल्याने अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“शेतकऱ्यांनी शासनाकडे आपला हिस्सा भरला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने यापुढे विलंब न करता उर्वरित सोलर पंपही तातडीने बसवून द्यावेत,” अशी भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भुरू गंगा पेंडाम, गुरुदास गोविंदा सेडमेक यांच्यासह एट्टापल्ली व चामोर्शी तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी सोलर पंपाचे साहित्य दारापर्यंत पोहोचल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे आभार मानले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला अखेर यश आले असून, आता साहित्य पोहोचले असले तरी पंप प्रत्यक्ष शेतात बसविण्याची कार्यवाही किती वेगाने होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

