Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत वैद्यकीय चमत्कार : अवघे २.२ हिमोग्लोबिन, डेंग्यू अन् हृदयविकाराचा विळखा; हेडरीच्या LKAM रुग्णालयाने वाचवले आई-लेकीचे प्राण!

पिपली बुर्गीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आलेल्या अत्यंत गंभीर गर्भवतीवर यशस्वी उपचार..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली :अवघे २.२ ग्रॅम हिमोग्लोबिन, प्लेटलेट्सची तीव्र घट, डेंग्यूचा संसर्ग, उच्च रक्तदाब (प्री-एक्लेम्पसिया) आणि हृदय निकामी होण्याचा थेट धोका… मृत्यूशी झुंजणाऱ्या एका गर्भवती मातेसाठी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (LKAM) चे वैद्यकीय पथक देवदूत ठरले. अत्यंत गुंतागुंतीच्या व नाजूक वळणावर पोहोचलेल्या या उच्च-जोखमीच्या बाळंतपणात डॉक्टरांनी आईसह नवजात बालिकेचे प्राण सुखरूप वाचवून वैद्यकीय कौशल्याचा नवा आदर्श रचला आहे.

धोक्याच्या उंबरठ्यावरील आव्हान..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पिंपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुमन वेल्डा या गर्भवती मातेला ४ सप्टेंबर रोजी अतिशय नाजूक स्थितीत हेडरीच्या LKAM रुग्णालयात हलवण्यात आले. शरीरातील हिमोग्लोबिन केवळ २.२ वर आले होते, प्लेटलेट्स कोसळल्या होत्या आणि डेंग्यूमुळे अंतर्गत अवयवांवर प्रचंड ताण होता. डॉक्टरांच्या पथकाने सर्वप्रथम आईची प्रकृती स्थिर करण्याचे आव्हान स्वीकारले.

उपचारांचा भाग म्हणून प्रसूतीपूर्वी मातेला तत्काळ ५ युनिट पॅक्ड रेड सेल्स (PRC) आणि २ युनिट रँडम डोनर प्लेटलेट्स (RDP) चढवण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गर्भाभोवती पाणी कमी; घेतला तत्काळ सिझेरियनचा निर्णय..

आईची प्रकृती सावरत असतानाच तपासणीत गर्भाच्या हालचाली मंदावल्याचे (नॉन-रिअश्योरिंग NST) आणि गर्भाभोवतीचे पाणी अत्यंत कमी (ओलिगोहायड्राम्निओस) झाल्याचे समोर आले. बाळामध्ये ‘फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन’ची लक्षणे दिसत असल्याने प्रसूती लांबवणे जीवावर बेतू शकत होते.

१० सप्टेंबर रोजी सकाळी १०:५३ वाजता डॉक्टरांनी तातडीने आपत्कालीन सिझेरियन (LSCS) शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान आणखी २ युनिट PRC, १ युनिट SDP आणि १ युनिट FFP चा पुरवठा करण्यात आला. गर्भाशयात ‘कुव्हेलेअर’सारखी (Couvelaire changes) गुंतागुंत असतानाही डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने १.६५७ किलो वजनाच्या चिमुरडीला सुरक्षितपणे जन्म दिला. जन्मानंतर बालिकेचे रडणे ऐकताच शस्त्रक्रियागृहासह कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

आई-बाळ दोघेही सुरक्षित..

सध्या आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती वेगाने सुधारत असून त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दुर्गम भागात वेळेवर मिळालेला रक्तघटकांचा पुरवठा, अचूक निदान आणि जलद निर्णयप्रक्रियेमुळेच हा अनपेक्षित चमत्कार शक्य झाला. या धाडसी आणि यशस्वी उपचारांबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी संपूर्ण वैद्यकीय पथकाचे विशेष कौतुक केले असून, ग्रामीण भागातील जनतेला सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी रुग्णालय सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.