मुलीचा आरडाओरडा अन् प्लास्टिकचा टब ठरला ढाल; पोर्ला शिवारात शेतकऱ्याने परतवून लावला वाघाचा हल्ला!
शेतात खत टाकत असताना घडला थरार; शेतकरी गंभीर जखमी, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतात पिकाला खत घालताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झेप घेतली, मात्र मुलीने राखलेले प्रसंगावधान आणि हातात असलेल्या प्लास्टिकच्या टबाने शेतकऱ्याने केलेला निकराचा प्रतिकार यामुळे एका शेतकऱ्याचे प्राण वाचल्याची थरारक घटना पोर्ला शेतशिवारात रविवारी दुपारी घडली. या हल्ल्यात भाऊराव भगवान म्हशाखेत्री (वय ४२, रा. पोर्ला) हे जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमका कसा घडला थरार?…
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊराव म्हशाखेत्री हे रविवारी सकाळी आपल्या मुलीसह शेतात पिकांना खत टाकण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास काम आटोपून ते शेतात विश्रांतीसाठी बसले असता, दबा धरून बसलेल्या एका पट्टेरी वाघाने दुपारी १:३० वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला.
मुलीची सतर्कता, प्लास्टिकच्या टबाने प्रतिकार…
साक्षात मृत्यू समोर उभा ठाकलेला पाहून जवळच उभ्या असलेल्या मुलीने क्षणाचाही विलंब न करता प्रचंड आरडाओरड केली. मुलीच्या आवाजाने भाऊराव सतर्क झाले. काही सुचण्याच्या आत त्यांनी हातात असलेल्या खताच्या प्लास्टिक टबानेच वाघावर प्रतिहल्ला चढवला. या अनपेक्षित प्रतिकारामुळे आणि मुलीच्या आवाजामुळे वाघ बिथरला व त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. वाघाच्या हल्ल्यात भाऊराव यांच्या पोटाला आणि डाव्या हाताला पंजा लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
रुग्णालयात उपचार, वनविभागाकडून पंचनामा..
घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने भाऊराव यांना तातडीने पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पाचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, पोर्ला शिवारात गेल्या काही महिन्यांपासून वाघाचा वावर सातत्याने वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या हिंस्त्र श्वापदाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

