Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुसेर टेकडीवर उत्खननाच्या हालचाली? २२ ग्रामसभांचा विरोध

ग्रामसभेची पूर्वसंमती घेतल्याशिवाय खाणकाम करू देणार नाही; पाविमुरांडा इलाखा महाग्रामसभेचे प्रशासनाला निवेदन...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पाविमुरांडा इलाख्यातील पुसेर टेकडीवर प्रस्तावित खाणकामाच्या हालचालींमुळे स्थानिक आदिवासी ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुसेर टेकडीवरील उत्खननाला पाविमुरांडा इलाख्यातील तब्बल २२ ग्रामसभांनी विरोध दर्शविला असून, ग्रामसभेची पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे उत्खनन अथवा खाणकाम करू देऊ नये, अशी ठाम भूमिका ग्रामसभांनी घेतली आहे.

पाविमुरांडा पारंपरिक इलाखा महाग्रामसभेच्या वतीने २२ गावांतील ग्रामसभा सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या भागातील जल, जंगल आणि जमिनीशी असलेले पारंपरिक नाते, आदिवासींच्या रूढी-परंपरा तसेच सामुदायिक हक्कांचा विचार करूनच प्रस्तावित खाणकामाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामसभांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ग्रामसभेच्या म्हणण्यानुसार, पुसेर गावाच्या हद्दीतील सर्वे क्रमांक ५४, ५५ आणि ६२ मधील सुमारे ७५.४० हेक्टर क्षेत्रात खाणकाम करण्यासाठी शिवमहाकाल मायनिंग अँड मिनरल्स या कंपनीने तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची माहिती मिळाल्यानंतर पाविमुरांडा इलाख्यातील २२ ग्रामसभांनी एकत्रित भूमिका घेत प्रशासनाकडे आपले आक्षेप नोंदविले आहेत.

पेसा, वनहक्काच्या तरतुदींचा दाखला…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला स्थानिक रूढी-परंपरा, सांस्कृतिक ओळख आणि सामुदायिक संसाधनांबाबत महत्त्वाची भूमिका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पेसा कायदा तसेच वनहक्क कायद्यातील तरतुदींचा दाखला देत, ग्रामसभेच्या अधिकारांचा विचार न करता प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी भूमिका ग्रामसभांनी मांडली आहे.

गावकऱ्यांच्या मते, खाणकामाचा प्रश्न केवळ उत्खननापुरता मर्यादित नसून त्याचा परिणाम परिसरातील जंगल, जलस्रोत, शेती, उपजीविका आणि पारंपरिक जीवनपद्धतीवर होऊ शकतो. त्यामुळे प्रस्तावित खाणकामाबाबत निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सर्व ग्रामसभांचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सूरजागडनंतर पुसेरकडे लक्ष…

गडचिरोलीच्या दक्षिण भागातील सूरजागड टेकडीवरील लोहखनिज उत्खननाच्या पार्श्वभूमीवर पुसेर टेकडीचा मुद्दा पुढे आला आहे. सूरजागड येथे खाणकामाला स्थानिकांकडून विरोध झाल्यानंतर रोजगार, विकास, पर्यावरण आणि आदिवासींचे पारंपरिक हक्क याबाबत विविध स्तरांवर चर्चा झाली होती.

आता चामोर्शी तालुक्यातील पुसेर टेकडीवर प्रस्तावित उत्खननाच्या हालचाली सुरू झाल्याने खाणकाम आणि ग्रामसभेचे अधिकार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. २२ ग्रामसभांनी एकत्रितपणे विरोधाची भूमिका घेतल्याने प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते आणि प्रस्तावित खाणकामाबाबत पुढील प्रक्रिया कशी होते, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.