Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गावातच घडणार अधिकारी; कवठीच्या अभ्यासिकेतून ग्रामीण स्वप्नांना नवी झेप!

आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नवेगाव व कवठीत दीड कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण; १.२५ कोटींची सुसज्ज अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सावली : स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शहरांची वाट धरणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता गावातच अभ्यासाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सावली तालुक्यातील कवठी येथे तब्बल १ कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेली सुसज्ज अभ्यासिका ग्रामीण तरुणाईच्या शैक्षणिक आकांक्षांना नवी दिशा देणारी ठरणार आहे. केवळ सुविधा उपलब्ध करून देणे नव्हे, तर ग्रामीण भागातूनही प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, अभियंते आणि गुणवंत व्यावसायिक घडावेत, हा या उपक्रमामागील व्यापक दृष्टिकोन आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्दीची कमतरता नाही; त्यांना योग्य संधी आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

सावली तालुक्यातील नवेगाव आणि कवठी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या दौऱ्यात सुमारे दीड कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. नवेगाव येथे जनसुविधा योजनेंतर्गत २० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत भवनाचे, तर कवठी येथे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर अभ्यासासाठी योग्य जागा, शांत वातावरण, संदर्भ साहित्य आणि आवश्यक सुविधांचा अभाव ही मोठी अडचण असते. अनेकदा गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शहरात राहून शिक्षण घेणे किंवा परीक्षांची तयारी करणे शक्य होत नाही. परिणामी अनेकांच्या स्वप्नांना मर्यादा पडतात. ही दरी दूर करण्याच्या दृष्टीने कवठीतील अभ्यासिकेची उभारणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या सुविधेमुळे कवठी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना गावाजवळच एकाग्रतेने अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, यासाठी शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या अभ्यासिकेतून भविष्यात प्रशासकीय सेवांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी घडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दुसरीकडे, नवेगाव येथे उभारण्यात आलेले २० लाख रुपयांचे ग्रामपंचायत भवन गावाच्या स्थानिक प्रशासनाला नवी कार्यक्षमता देणारे ठरणार आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज जागा उपलब्ध झाल्याने प्रशासकीय व्यवहार अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या सेवा आणि सुविधांची उपलब्धता अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण विकासाची संकल्पना केवळ रस्ते, इमारती आणि भौतिक सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित नसावी. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक प्रगती यांचा समतोल साधल्यासच गावांचा शाश्वत विकास शक्य आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असून, जनतेच्या गरजेनुसार विकासकामांना प्राधान्य दिले जाईल आणि निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.

नवेगावचे ग्रामपंचायत भवन स्थानिक प्रशासनाला बळ देणारे ठरणार असले, तरी कवठीची अभ्यासिका या परिसराच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची ठरणार आहे. कारण गावात उभी राहिलेली ही इमारत केवळ अभ्यासाची जागा नसून, ग्रामीण भागातील तरुणांच्या महत्त्वाकांक्षांना आकार देणारे व्यासपीठ ठरण्याची क्षमता बाळगते. शहरात जाण्याची सक्ती न ठेवता गावातच संधी निर्माण झाल्यास ग्रामीण गुणवत्तेलाही मोठी भरारी घेता येते, याचीच ही नवी सुरुवात ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.