निवृत्तीवेतनाच्या अडचणींना आता थेट उत्तर!
गडचिरोलीत उद्या ‘पेंशन अदालत’; महालेखापाल कार्यालयाचे अधिकारी थेट निवृत्तीवेतनधारकांच्या भेटीला ई-पीपीओसह ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीबाबत DDOना विशेष मार्गदर्शन.....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : निवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन हे केवळ आर्थिक आधार नसून अनेक कुटुंबांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार असतो. मात्र निवृत्तीवेतन मंजुरी, प्रलंबित प्रकरणे, कुटुंबनिवृत्तीवेतन अथवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा निवृत्तीवेतनधारकांना कार्यालयीन प्रक्रियेत हेलपाटे मारावे लागतात. अशा अडचणींना आता थेट व्यासपीठ मिळणार असून, महालेखापाल कार्यालय, नागपूर यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत रोज मंगळवार (६ ऑक्टोबर) रोजी ‘पेंशन अदालत’ भरविण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, समाजकल्याण कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे होणाऱ्या या उपक्रमात राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना आपल्या निवृत्तीवेतनाशी संबंधित अडचणी थेट महालेखापाल कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. प्रलंबित प्रकरणे, तक्रारी, शंका आणि प्रक्रियेशी संबंधित प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करून त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे.
‘पेंशन अदालत’मुळे अडचणी मांडण्याची थेट संधी…
निवृत्तीवेतनाशी संबंधित एखादे प्रकरण प्रलंबित असल्यास किंवा निवृत्तीवेतन मिळण्याबाबत काही अडचण असल्यास संबंधितांना ती थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहे. त्यामुळे केवळ अर्ज-निवेदनांच्या प्रक्रियेत न अडकता संबंधित प्रश्नाची वस्तुस्थिती समजून घेऊन मार्गदर्शन मिळण्याची संधी निवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध होणार आहे.
महालेखापाल कार्यालयातील अधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याने निवृत्तीवेतनधारकांच्या विविध शंकांना अधिकृत पातळीवर उत्तरे मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
DDOंसाठीही महत्त्वाची कार्यशाळा….
‘पेंशन अदालत’सोबतच जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्तीवेतन प्रकरणांची प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने ई-पीपीओ (इलेक्ट्रॉनिक निवृत्तीवेतन प्रदान आदेश) प्रणालीच्या कार्यपद्धतीचे सविस्तर प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे.
याशिवाय ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीचा प्रभावी वापर, त्याची कार्यपद्धती आणि संबंधित प्रक्रियेबाबत महालेखापाल कार्यालयातील तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. प्रणालीच्या वापराबाबत अधिकाऱ्यांच्या मनात असलेल्या शंकांचेही यावेळी निरसन केले जाणार आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी संधीचा लाभ घ्यावा…
निवृत्तीवेतनाशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची ही संधी असल्याने जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ‘पेंशन अदालत’मध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या व शंका मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी गेडाम यांनी केले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यशाळेला वेळेवर उपस्थित राहून ई-पीपीओ आणि ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीविषयी आवश्यक माहिती करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

