Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालक निघून गेले… त्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या!

सोनसरी आश्रमशाळेतील १४ वर्षीय मुलीच्या मृत्यूने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; अधीक्षक, कर्मचारी आणि समुपदेशन व्यवस्थेच्या भूमिकेची चौकशी करण्याची गरज....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय रानू कृष्णा हलामी या विद्यार्थिनीने सोमवारी, दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती सोनसरीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मोहगाव येथील रहिवासी होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी आश्रमशाळेत पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी रानूचे आई-वडील शाळेत आले होते. यावेळी रानूची प्रकृती बरी नसल्याने तिने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पालक सभा आटोपल्यानंतर आई-वडील निघून गेले. त्यावेळी रानूला घरी जायचे असल्याने तिने आग्रह धरला होता. मात्र, तिला घरी जाऊ न देण्यासाठी एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. याचदरम्यान, रागाच्या भरात रानूने वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा नेमका घटनाक्रम अद्याप स्पष्ट झालेला नसून, त्याबाबत अधिकृत तपासातूनच वस्तुस्थिती समोर येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेत विद्यार्थिनीची प्रकृती बरी नसणे, घरी जाण्याची इच्छा आणि पालक निघून गेल्यानंतर घडलेला प्रसंग या बाबी समोर येत आहेत. मात्र, पालक निघून गेल्यानंतर तिच्या भावनिक अवस्थेकडे लक्ष देण्यात आले होते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तिने घरी जाण्याचा आग्रह धरल्यानंतर शाळेतील जबाबदार कर्मचाऱ्यांनी कोणती भूमिका घेतली? तिला खोलीत डांबून ठेवण्यात आल्याच्या पालकांच्या आरोपात तथ्य आहे का? ती खोलीत गेल्यानंतर तिच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्यात आली होती का? अधीक्षक, शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांची त्या वेळी नेमकी भूमिका काय होती? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र, पोलिसांचा तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरविता येणार नाही.

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या प्रकरणानंतरही आश्रमशाळांमधील सुरक्षितता आणि व्यवस्थापनाचे मुद्दे चर्चेत आले होते. आता सोनसरीतील घटनेमुळे अधीक्षक व अधीक्षिकांची रिक्त पदे, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, नियमित देखरेख आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची व्यवस्था यांचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित निवासासोबत भावनिक आधार आणि गरज पडल्यास तातडीने मदत मिळणेही महत्त्वाचे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच आश्रमशाळा प्रशासनाने पोलिसांशी संपर्क साधून पालकांना कळविले. कुरखेडा पोलिस ठाण्याचे अधिकारी जगताप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या तपासात विद्यार्थिनीच्या मृत्यूपूर्वीचा घटनाक्रम, पालकांनी केलेल्या आरोपांची सत्यता, शाळेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि देखरेखीची व्यवस्था यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभागानेही संबंधित आश्रमशाळेतील व्यवस्थेची तपासणी करून कर्तव्यपालनात त्रुटी आढळल्यास नियमानुसार जबाबदारी निश्चित करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबत त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रभावी समुपदेशन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज या दुर्दैवी घटनेने अधोरेखित केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.