स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर ‘बोदली टोला’ अंधाराच्या विळख्यातून मुक्त; १६ घरांत पेटला विकासाचा दिवा!
दोन पिढ्यांची प्रतीक्षा संपली; जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा आणि महावितरणच्या धडपडीतून नक्षलग्रस्त अतिदुर्गम पाड्यात अवतरली ‘खरी दिवाळी’...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली / एटापल्ली :
देश स्वतंत्र होऊन पावणेआठ दशके उलटली तरी घनदाट जंगल आणि डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या एटापल्ली तालुक्यातील ‘बोदली टोला’ या अतिदुर्गम पाड्याच्या नशिबी असलेला पिढ्यान्पिढ्यांचा अंधार अखेर कायमचा संपला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या पाड्यावरील १६ कुटुंबांच्या झोपड्यांमध्ये विजेचा लखलखाट झाला असून, ग्रामस्थांसाठी ही केवळ वीज नसून त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलवणारी ‘खरी दिवाळी’ ठरली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा संवेदनशील पाठपुरावा आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम यांमुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात यश आले आहे.
आधुनिक जगाशी कसलाही संपर्क नसलेल्या बोदली टोला गावातील दोन पिढ्यांनी अंधाराशी संघर्ष करत आयुष्य कंठले. सूर्यास्तानंतर घरात दिव्याची वात आणि बाहेर वन्यजीवांची भीती, अशा भयाण वातावरणात ग्रामस्थ वावरत होते. रात्रीच्या वेळी चिमणीच्या धुरकट प्रकाशात मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि आरोग्याच्या प्राथमिक सुविधांचा अभाव यामुळे हा पाडा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मैलोनमैल दूर राहिला होता. मात्र, प्रशासनाने दाखवलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आदिवासी विकास उपयोजनेच्या माध्यमातून ३३ लाख ६० हजार रुपयांचा निधी खेचून आणत या पाड्याला प्रकाशाच्या महामार्गावर आणण्याचा निर्धार करण्यात आला.
घनदाट जंगल, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि हिंस्र श्वापदांचा धोका पत्करत महावितरणच्या पथकाने २.५० किलोमीटरची उच्चदाब वाहिनी, १ किलोमीटरची लघुदाब वाहिनी आणि ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र (डीपी) उभारण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अखेर या पाड्यावरील मीटरची चक्रे फिरली आणि पहिल्यांदाच प्रत्येक घरात विजेचा बल्ब उजळला. त्या क्षणी अनेक वयोवृद्ध ग्रामस्थांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले; तर चिमुकल्यांनी दिव्यांच्या प्रकाशात उड्या मारत जल्लोष केला.
घरात पोहोचलेल्या या प्रकाशामुळे आता गावातील पुढील पिढीचे भविष्य अंधारात बुडणार नाही. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अखंड अभ्यास करणे शक्य होणार असून, मोबाईल चार्जिंगपासून ते सिंचन आणि कुटिरोद्योगांपर्यंत नवनवीन संधींची कवाडे खुली झाली आहेत. अतिदुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असून, बोदली टोलाचा हा प्रकाश संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात बोदली टोलाने पाहिलेली प्रकाशाची ही पहिली पहाट गडचिरोलीच्या प्रशासकीय इच्छाशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे.

