नक्षलवाद संपताच ‘बिनागुंडा’त मानवतेचा उजेड; १०० किमीचा दुर्गम प्रवास तुडवत तरुणांनी जागवले बिरसा-आंबेडकरांचे विचार
छत्तीसगड सीमेवरील अतिसंवेदनशील गावापर्यंत पोहोचली मदतीची ऊब; डॉ. अजय कंकडालवार यांच्या सहकार्याने ‘एवायआरसी’ने जागवली विकासाची नवी पहाट...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली (गडचिरोली): जिथे कालपर्यंत नक्षलवादाच्या दहशतीमुळे पाऊल ठेवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण मानले जात होते आणि जेथे पोहोचण्यासाठी आजही धड रस्ते नाहीत, त्या छत्तीसगड सीमेवरील ‘बिनागुंडा’ या अतिदुर्गम आदिवासी पाड्यात यंदा माणुसकीची खरी दिवाळी साजरी झाली. गडचिरोली पोलिसांनी चालवलेल्या धडक मोहिमेनंतर हा परिसर नक्षलमुक्त झाला आणि विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्याचा नवा विश्वास निर्माण झाला आहे. याच ऐतिहासिक बदलाची साक्ष देत आणि ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत, आलापल्लीच्या ‘आंबेडकराइट्स यूथ रिव्होल्यूशन कमिटी’च्या (AYRC) ध्येयवेड्या तरुणांनी घनदाट जंगले आणि डोंगर-दऱ्यांचा तब्बल १०० किलोमीटरचा खडतर प्रवास तुडवत थेट शेवटच्या टोकावरील बिनागुंडा गाठले. महापुरुषांचे विचार केवळ भाषणांच्या व्यासपीठावर न अडकवता, प्रत्यक्ष कृतीतून रक्तामांसाच्या माणसांपर्यंत पोहोचवून या तरुणांनी सामाजिक बांधिलकीची एक नवी क्रांती घडवून आणली आहे.
हा संपूर्ण सामाजिक उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्या थेट आर्थिक योगदानातून, भक्कम पाठबळातून आणि दूरदर्शी मार्गदर्शनातून यशस्वी झाला. त्यांच्या पुढाकारामुळेच यंत्रणा आणि समाजापासून कोसो दूर असलेल्या या बांधवांपर्यंत वेळेत मदत पोहोचू शकली.
दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत ज्या भागात जाण्याची साधी कल्पनाही करता येत नव्हती, त्या बिनागुंड्यात पोहोचून कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांना अन्नधान्य किट्स आणि फळांचे वाटप केले. केवळ कोरडी मदत न देता, कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या पायाभूत समस्या, शिक्षणाची वानवा आणि आरोग्याच्या अडीअडचणी समजून घेतल्या. भगवान बिरसा मुंडा यांच्या ‘जल, जंगल आणि जमीन’ या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून देत, आदिवासी समाजाने आपल्या हक्कांसाठी सजग व्हावे, व्यसनांना मूठमाती द्यावी आणि एकजूट राखावी, असा थेट संदेश या वेळी देण्यात आला.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार सांगत मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व आणि शासकीय योजनांची माहिती या वेळी दुर्गम पाड्यांतील बांधवांना करून देण्यात आली. नक्षलमुक्त गडचिरोलीच्या नव्या पर्वात आता सर्वसामान्य समाज आणि संवेदनशील नेतृत्व थेट बांधावर पोहोचून आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी उभे राहत असल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
मदतकार्यानंतर तरुणांनी बिनागुंड्यातील विहंगम धबधब्याला भेट देत या परिसरातील निसर्गसौंदर्यही अनुभवले. संकटांवर मात करत शंभर किलोमीटरचे अंतर पार करून आलेली ही नवी पिढी केवळ मदतीचा हात घेऊन गेली नव्हती, तर शतकांपासून अंधारात चाचपडणाऱ्या बिनागुंड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात खेचून आणण्याची पक्की हमी देऊन परतली आहे…

