Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…अखेर अतिदुर्गम मोरमेट्टा गावात पोलिसांच्या पुढाकाराने वीजपुरवठा सुरळीत

नेलगुंडा पोलिस व महावितरणच्या संयुक्त प्रयत्नांना यश; वर्षांपासून रखडलेली विद्युत सेवा सुरू, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : माओवादाच्या प्रभावामुळे वर्षानुवर्षे विकासापासून दूर राहिलेल्या गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात आता विकासाचा प्रकाश पोहोचू लागला आहे. भामरागड उपविभागातील नेलगुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम मोरमेट्टा गावात अखेर विद्युत सेवा सुरळीत करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिस दलाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि महावितरणच्या सहकार्याला यश आले असून, १६ नोव्हेंबर रोजी गावातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अवघड भौगोलिक परिस्थिती, घनदाट जंगल, वाहतुकीच्या मर्यादित सुविधा आणि सुरक्षा आव्हाने यामुळे मोरमेट्टात वीज पोहोचविण्याचे प्रयत्न यापूर्वी अयशस्वी ठरले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी गावात विद्युत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, दुर्गम आणि जंगलमय परिसरामुळे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. त्यानंतर विद्युत खांब पडणे तसेच वायर जोडणी तुटल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान आणखी वाढले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र, गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गडचिरोली पोलिस दलाने महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. पोलिस दल आणि महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर विद्युत यंत्रणा दुरुस्त करून १६ नोव्हेंबर रोजी मोरमेट्टात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वीज आली; गावाच्या विकासाला नवी ऊर्जा…

वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे मोरमेट्टा गावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे. घरांमध्ये प्रकाशाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा, तसेच आरोग्य आणि इतर मूलभूत सेवांमध्येही याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नेलगुंडा पोलिस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर परिसरातील विकासकामांना गती मिळाली आहे. पोलिस दलाच्या सहकार्याने बोगामी नाल्यावर पूल उभारण्यात आल्याने अनेक गावांचा संपर्क सुलभ झाला आहे. नेलगुंडा येथे सोलर लॅम्प बसविण्यात आले आहेत. तसेच पोलिस दलाच्या दादालोरा खिडकी उपक्रमातून महिला मेळावे, आरोग्य मेळावे, कृषी मेळावे, आधार कार्ड शिबिरे आणि जनजागरण कार्यक्रम घेण्यात आले. या माध्यमातून सुमारे २ हजार ५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.

दुर्गम भागात विकासाची पावले अधिक वेगाने…

मूलभूत सुविधा पोहोचविण्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्यात संपर्क व्यवस्था मजबूत करण्यावरही भर देण्यात येत आहे. पोलिस दलाच्या संरक्षणात जिल्ह्यात ५६७ मोबाईल टॉवर्सची उभारणी, ४२४.२७ किलोमीटर रस्त्यांचे तसेच ६५ पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासनाशी जोडण्यासह शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याच्या संधी अधिक सुलभ होत आहेत.

माओवादाच्या सावटातून बाहेर पडत असलेल्या गडचिरोलीत विकासाच्या माध्यमातून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ करण्याच्या प्रयत्नांना मोरमेट्ट्यातील वीजपुरवठ्यामुळे आणखी बळ मिळाले आहे. सुरक्षा आणि विकास हे दोन्ही हातात हात घालून पुढे गेल्यास दुर्गम भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल, हे मोरमेट्ट्यातील उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

“मोरमेट्टा गावात वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा मिळतील, तसेच आरोग्य, पाणी आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित सेवांना याचा फायदा होईल. दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस दल संबंधित विभागांच्या समन्वयाने सातत्याने प्रयत्नशील आहे,” अशी प्रतिक्रिया पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी व्यक्त केली.

या उपक्रमासाठी पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलिस अधीक्षक (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि सहायक पोलिस अधीक्षक (भामरागड) सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेलगुंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजिंक्य इथापे, पोलीस उपनिरीक्षक राहुल जेंगठे, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक मोराणकर, ग्रामसेवक मनमावरे, वरिष्ठ तंत्रज्ञ राजू माहाका, मोरमेट्टा गावातील तरुण तसेच नेलगुंडा पोलिस आणि एसआरपीएफच्या जवानांनी विशेष प्रयत्न केले..

Leave A Reply

Your email address will not be published.