Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा घातपाताचा कट उधळला! हिक्केरच्या जंगलात पुरलेला स्फोटक-शस्त्रसाठा जप्त..

गडचिरोली पोलिसांच्या 'सी-६०' आणि 'बीडीडीएस' पथकाची धडक कारवाई; रायफल, ३१ जिवंत काडतुसे, हँडग्रेनेड, बीजीएल लाँचरसह जनरेटर जप्त..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: जिल्ह्यातील दुर्गम जंगल आणि सीमावर्ती भागाचा फायदा घेत सुरक्षा दलांवर मोठा घातपात घडवण्याचा माओवाद्यांचा मनसुबा गडचिरोली पोलिसांनी उधळून लावला आहे. गर्देवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात जमिनीखाली पुरून ठेवलेला शस्त्रे, स्फोटके आणि घातक साहित्याचा प्रचंड साठा पोलिसांनी उकरून काढत जप्त केला. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे नक्षल्यांच्या घातपाती हालचालींना मोठा सुरुंग लागला आहे.

गोपनीय माहितीवरून ‘सर्च ऑपरेशन’..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हिक्केरच्या घनदाट जंगलात माओवाद्यांनी मोठा शस्त्रसाठा जमिनीत पुरून ठेवल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक एम. रमेश यांना मिळाली होती. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी विशेष रणनीती आखून शोधमोहीम हाती घेण्यात आली. गडचिरोली व प्राणहिता येथील विशेष अभियान पथकाच्या (सी-६०) पाच तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. जवानांनी जंगलाची नाकेबंदी करत संशयित ठिकाणे शोधून काढली आणि जमिनीत लपवलेला हा घातपाताचा साठा बाहेर काढला.

जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा-…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  •  अग्निशस्त्रे: एक १२ बोर रायफल, एक एअर गन रायफल.
  •  जिवंत काडतुसे: .३०३ बोअरची १३ जिवंत काडतुसे, ८ एमएमची १८ जिवंत काडतुसे (एकूण ३१ काडतुसे).
  •   स्फोटके व लाँचर्स: ३ हँडग्रेनेड, १८ बीजीएल (बॅरल ग्रेनेड लाँचर) सेल, २ बीजीएल लाँचर, १० डेटोनेटर, २१ सुराका सेल.
  •   इतर तांत्रिक साहित्य: होंडा कंपनीचा १ इलेक्ट्रिक जनरेटर, वायरचे २२ बंडल आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य.

मोठा कट उधळला

आगामी काळात नक्षल सप्ताह किंवा घातपाती कारवायांच्या माध्यमातून सुरक्षा दलांच्या तुकड्यांना लक्ष्य करण्यासाठीच हा साठा पुरून ठेवण्यात आला होता, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दुर्गम जंगलातील हा साठा निष्प्रभ झाल्यामुळे पोलिसांचे संभाव्य मोठे नुकसान टळले असून माओवाद्यांच्या नेटवर्कला जबर धक्का बसला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके तसेच सी-६०, इंटेलिजन्स सेल व बीडीडीएस पथकातील जवानांनी पार पाडली. शौर्य गाजवणाऱ्या सर्व अधिकारी व जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.