Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माओवादमुक्त गडचिरोलीची पहिली भयमुक्त दिवाळी!

बिनागुंड्यापासून ७० पोलीस केंद्रांपर्यंत ‘माओवादमुक्त दिवाळी’चा उत्सव; आत्मसमर्पित सदस्यांसह दुर्गम भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या आनंदात पोलिसांचा सहभाग...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : वर्षानुवर्षे माओवादाच्या हिंसक सावटाखाली जगलेल्या गडचिरोलीच्या दुर्गम भागात यंदाची दिवाळी केवळ सणाची राहिली नाही, तर भीतीच्या अंधारातून शांततेच्या प्रकाशाकडे झालेल्या प्रवासाची साक्ष ठरली. बंदुकीच्या दहशतीऐवजी विश्वासाचे वातावरण, भीतीऐवजी सुरक्षितता आणि हिंसेऐवजी विकासाचा संदेश देत गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभरात ‘माओवादमुक्त दिवाळी’ साजरी केली. विशेष म्हणजे, माओवादविरोधी लढ्याच्या निर्णायक टप्प्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रथमच भयमुक्त वातावरणात दिवाळीचा आनंद अनुभवला.

मे २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ नंतर गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने सुरक्षा व्यवस्थेसोबतच नागरिकांशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्याच भूमिकेतून रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे आणि पोलीस मदत केंद्रांवर नागरिकांच्या सहभागातून ‘माओवादमुक्त दिवाळी’ साजरी करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते अतिदुर्गम बिनागुंडा येथील दिवाळीचे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी स्वतः बिनागुंडा येथील पोलीस मदत केंद्राला भेट देत तेथील नागरिक आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. दुर्गम आणि पूर्वी माओवादाच्या प्रभावाखाली राहिलेल्या भागातील नागरिकांसोबत पोलीस अधीक्षकांनी दिवाळीचा आनंद वाटून घेतल्याने ‘पोलीस म्हणजे केवळ बंदूक नव्हे, तर संकटात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणारे आपलेच माणूस’ हा विश्वास अधिक दृढ झाला.

दुर्गम भागात वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिवाळी…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा यांनी पोलीस मदत केंद्र गर्देवाडा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी उपपोलीस ठाणे पेंढरी, तर अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. यांनी उपपोलीस ठाणे जिमलगट्टा येथे नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली.

जिल्ह्यातील सर्व ७० पोस्टे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्राच्या कार्यक्षेत्रात संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना मिठाई आणि फटाके वितरित करण्यात आले. त्यामुळे शहरापुरता मर्यादित असलेला दिवाळीचा उत्सव यंदा गडचिरोलीच्या दुर्गम गाव-पाड्यांपर्यंत पोहोचला.

ज्यांनी बंदूक सोडली, त्यांच्यासोबत पोलिसांची दिवाळी…

माओवादाची हिंसक विचारसरणी त्यागून बंदुकीचा मार्ग सोडत शांतता आणि विकासाचा मार्ग स्वीकारलेल्या आत्मसमर्पित सदस्यांसाठीही यंदाची दिवाळी विशेष ठरली. नवजीवन वसाहत, गडचिरोली येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित सदस्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

आत्मसमर्पित सदस्यांना मिठाई व फटाके वितरित करण्यात आले. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत पोलिसांनी सुरक्षितता, विश्वास आणि आपलेपणाचा संदेश दिला. समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्याची संधी मिळालेल्या या सदस्यांसाठी ही दिवाळी त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाचे प्रतीक ठरली.

दुष्काळाच्या संकटातही शेतकऱ्यांच्या घरात पोहोचला दिवाळीचा फराळ…

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील शेतकरी यंदा दुष्काळ आणि शेतीच्या संकटाला सामोरे जात आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांच्या दिवाळीतही आनंदाचा प्रकाश पोहोचावा, या उद्देशाने पोलीस दलाने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविला.

गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी, प्रोजेक्ट कृषी समृद्धी, सेवा मित्र मंडळ आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना अन्नधान्य व दिवाळीचा फराळ वितरित करण्यात आला.

सणाच्या काळात गरजू कुटुंबांच्या घरात अन्नधान्याची मदत पोहोचविण्याबरोबरच त्यांच्या आनंदात सहभागी होत पोलीस दलाने ‘सणाचा प्रकाश प्रत्येकाच्या घरात पोहोचला पाहिजे’ ही सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.

भीतीच्या दिवाळीची जागा घेतली विश्वासाच्या दिवाळीने…

एकेकाळी माओवादाच्या धास्तीमुळे सायंकाळ होताच गावांवर भीतीचे सावट पसरत असे. आज त्याच भागात पोलीस आणि नागरिक एकत्र येऊन दिवाळी साजरी करीत आहेत, ही बदलत्या गडचिरोलीची महत्त्वपूर्ण नोंद मानली जात आहे.

माओवादाविरोधातील कारवाईला केवळ सुरक्षा अभियानाचे स्वरूप न देता नागरिकांचा विश्वास जिंकणे, आत्मसमर्पितांना मुख्य प्रवाहात आणणे, दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद वाढविणे आणि विकासाच्या प्रक्रियेला गती देणे या व्यापक भूमिकेतून पोलीस दलाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी गडचिरोलीसाठी माओवादाच्या अंताची आणि नव्या शांततामय पर्वाच्या सुरुवातीची प्रतीकात्मक दिवाळी ठरली आहे.

‘विश्वासाचे नाते अधिक दृढ करू’ — एम. रमेश….

“माओवादमुक्त गडचिरोलीच्या वाटचालीत केवळ सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थाच नव्हे, तर सामाजिक सलोखा, लोकसहभाग, विश्वास आणि विकास यांनाही तितकेच महत्त्व आहे. पोलीस दल आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून शांततामय, सुरक्षित आणि विकसित गडचिरोली घडविण्यासाठी असे लोकाभिमुख उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील,” असे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले.

या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.