Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील नवेगाव ठरले पहिले ‘‘ सौर ऊर्जादीप’

१०५ घरांच्या छतावरून पेटली ४२४ किलोवॅटची हरित मशाल; पाच मातब्बर गावांना धूळ चारत नवेगावने पटकावला जिल्ह्याचा पहिला ‘मॉडेल सोलर व्हिलेज’चा मान, गावाच्या स्वावलंबनासाठी केंद्राकडून १ कोटींचा महानिधी जाहीर...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : पारंपरिक विजेची लपंडाव, दरमहा येणाऱ्या अवाढव्य बिलांचा जाच आणि शासकीय मदतीची वाट पाहण्याची लाचारी.. या साऱ्या पारंपरिक मानसिकतेला कायमचा सुरुंग लावत गडचिरोली तालुक्यातील नवेगावने जिल्ह्याच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी नवा अध्याय लिहिला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’चा हत्यारासारखा वापर करत अवघ्या गावाने स्वतःच्या घरांच्या छतांवर अक्षरशः सूर्यच उतरवून ठेवला आहे. एकाच गावातील १०५ जागरूक कुटुंबांनी एकजुटीने स्वतःच्या घरांवर ४२४.२२ किलोवॅट इतक्या अवाढव्य क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा उभी करत गडचिरोली जिल्ह्यातील पहिलेवहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ (आदर्श सौर गाव) होण्याचा ऐतिहासिक बहुमान आपल्या नावावर कोरला आहे.

नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) आदेशानुसार पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये स्वच्छ ऊर्जेची चुरस लावण्यात आली होती. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील बलाढ्य पाच गावांची निवड केली होती. यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली व कुनघाडा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी, गडचिरोली तालुक्यातील नवेगाव आणि वडसा तालुक्यातील कुरूड या गावांचा थेट सामना होता. १७ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत अटीतटीची स्पर्धा झाली. प्रशासकीय पातळीवर मोठी आणि पुढारलेली मानली जाणारी गावे जेव्हा केवळ चर्चांमध्ये अडकली होती, तेव्हा नवेगावातील नागरिकांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले की जनशक्ती काय असते! इतर चारही प्रमुख गावांना सौर ऊर्जा निर्मितीत खूप मागे टाकत नवेगावने तब्बल ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप प्रकल्प उभे केले आणि समितीने एका मताने नवेगावला जिल्ह्याचा विजेता घोषित केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावकऱ्यांच्या या अद्वितीय क्रांतीमुळे आता घराघरांतील वीज बिले नामशेष झाली असून विजेच्या बाबतीत गाव पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले आहे. या असामान्य कामगिरीची दखल खुद्द केंद्र शासनाने घेतली असून नवेगावला गावविकासासाठी १ कोटी रुपयांचे घसघशीत प्रोत्साहनपर अनुदान मंजूर केले आहे. केवळ घरगुती वीजच नव्हे, तर संपूर्ण गावच ग्रीडमुक्त आणि सौरऊर्जित करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. याच अनुदानातून गावातील शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी अशा १७ शासकीय व निमशासकीय इमारतींवर अतिरिक्त १०६ किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासाठी ६३.१२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामही वेगाने सुरू झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याकडे केवळ जंगल आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून पाहणाऱ्या व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालत नवेगावने स्वतःच्या कर्तृत्वाने एक नवा ऊर्जादीप प्रज्वलित केला असून, हा लखलखाट आता संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.