…जमिनीच्या पट्ट्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत माजी खा.डॉ. अशोक नेते यांची चर्चा
घोट परिसरातील आठ गावांतील शेतकऱ्यांची व्यथा; १९५८ पासून शेतीचा ताबा, मात्र गट क्रमांक-सातबारा नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : घोट क्षेत्रातील मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाही टोला, पेटतळा आणि भाडभिडी या गावांतील शेकडो शेतकरी वर्षानुवर्षे आपल्या जमिनीच्या कायदेशीर पट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्यक्ष शेतीचा ताबा असूनही जमिनीची अधिकृत नोंद, गट क्रमांक अथवा सर्व्हे क्रमांक निश्चित नसल्याने या शेतकऱ्यांना सातबारा उतारे मिळत नाहीत. परिणामी, शेतीशी संबंधित विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी येत आहेत. या प्रश्नाची तातडीने सोडवणूक करण्यासाठी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली.
या गावांतील अनेक शेतकरी सन १९५८ पासून संबंधित जमिनीवर प्रत्यक्ष शेती करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या ताब्यात जुन्या अतिक्रमण पंजीसह जमिनीच्या वहिवाटीशी संबंधित कागदपत्रे आहेत. मात्र, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या नोंदींमध्ये या शेतीशिवाराची अधिकृत प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीचे कायदेशीर पट्टे झालेले नाहीत.
नोंदीअभावी शेती असूनही हक्क अधांतरी…
जमिनीची प्रत्यक्ष वहिवाट आणि उपलब्ध कागदपत्रे असूनही अधिकृत गट किंवा सर्व्हे क्रमांक निश्चित नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळत नाही. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक कर्ज, पीकविमा, अनुदान तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.
शिष्टमंडळाने हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडताना उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून जमिनीची मोजणी, नोंदणी आणि आवश्यक महसूल प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी यासंदर्भातील निवेदनही सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन…
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अस्मिता मोरे यांना चर्चेसाठी बोलावून घेतले. उपस्थित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या ताब्यातील कागदपत्रे आणि जमिनीच्या वहिवाटीबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. संबंधित कागदपत्रांची तपासणी, प्रत्यक्ष मोजणी आणि महसूल तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.
पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पट्टे मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
या चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, डॉ. प्रणय खुणे, भाजप नेत्या अनिता रॉय, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, किशोर कुंडू, पलास घरामी, माजी सरपंच रमेश लेकलवार, आनंदराव तुंकलवार, अंकित मोहुर्ले, रवींद्र गर्तुलवार, देविदास गर्तुलवार, बाबुराव बर्लावार, गिरीधर आलाम, योगेंद्र चौधरी, गजानन गर्तुलवार यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते..

