पंचशील ध्वज हटविल्याच्या निषेधार्थ बौद्ध समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडो बौद्ध बांधवांची निदर्शने; २६ नोव्हेंबरपर्यंत ध्वज पूर्ववत लावण्याची मागणी...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील निमगाव येथे बौद्ध समाजाचा पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. १८) शेकडो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत तीव्र निदर्शने केली. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे संबंधित तहसीलदारांवर कारवाई करून पंचशील ध्वज पूर्ववत लावण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले.
निमगाव येथील बौद्ध समाज गेल्या दहा वर्षांपासून एका जागेवर महापुरुषांच्या जयंतीसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत आहे. सदर जागेवर समाजाचा ताबा असून ती जागा बौद्ध समाजाला अधिकृतपणे देण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल घेत २०२३ मध्ये जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तसेच अर्जदारांना कार्यवाहीची माहिती देण्याचे निर्देश तहसीलदार, धानोरा यांना दिले होते. मात्र, या निर्देशांनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता पोलिस बंदोबस्तात स्वतः उपस्थित राहून पंचशील ध्वज आणि धम्मखांब हटविल्याचा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. या कारवाईत ध्वजाचा आणि धम्मखांबाचा अवमान झाल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित जागेच्या मालकी व वापरासंदर्भातील प्रकरण प्रलंबित असताना प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ही कारवाई केल्याचा आक्षेप आंदोलकांनी घेतला.
येत्या २६ नोव्हेंबर या संविधान दिनापूर्वी पंचशील ध्वज पूर्ववत लावून संबंधित प्रकरणात उचित कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी केली. निर्धारित मुदतीत मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक जी. के. बारसिंगे, विलास केळझरकर, नामदेव दुधे, निमगाव बौद्ध समाजाच्या अध्यक्षा शीतल मेश्राम, रिपब्लिकन पार्टीचे मुनिश्वर बोरकर, बसपाचे जिल्हाध्यक्ष मेश्राम, सुधीर वालदे, राहुल वासनिक, चरणदास खोब्रागडे, प्रकाश शेंडे, प्रशांत नगराळे, करुणा बोरकर, रसिका बोरकर, मंगला अंबादे, नीलेश तटवारे यांच्यासह शेकडो बौद्ध बांधव सहभागी झाले होते.

