वसतिगृह, स्वाधार अर्जांसाठी आता अखेरची संधी
३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ; ‘सेंट बॅक’ अर्जही दुरुस्त करून फॉरवर्ड करणे बंधनकारक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २० : शासकीय वसतिगृह प्रवेश आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून पात्र विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील ऑनलाइन अर्जांना ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या अर्जदारांसाठीही ही शेवटची संधी ठरणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा लाभ घेता येणार आहे. अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनी अंतिम दिवसाची प्रतीक्षा न करता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचीन मडावी यांनी केले आहे.
‘Sent Back’ अर्जदारांनी विशेष खबरदारी घ्यावी
कागदपत्रे किंवा अर्जातील माहितीमध्ये त्रुटी आढळल्याने काही विद्यार्थ्यांचे अर्ज ‘Sent Back’ स्थितीत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी केवळ त्रुटी दुरुस्त करून थांबू नये, तर दुरुस्त केलेला अर्ज संबंधित महाविद्यालयामार्फत विहित प्रक्रियेनुसार ‘Forward’ झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
अर्जाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास केवळ त्रुटींची पूर्तता करूनही योजनेचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ‘Sent Back’ स्थितीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची सद्यस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३० नोव्हेंबरनंतर संधी नाही
विभागाने स्पष्ट केले आहे की, ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे नवीन अर्ज, नूतनीकरणाचे अर्ज तसेच त्रुटी असलेल्या अर्जांची पूर्तता या सर्व प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. अर्ज भरताना किंवा त्रुटी दूर करताना तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास मुदत संपण्यापूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागाने कळविले आहे.

