रक्ताची हाक अन् तत्काळ प्रतिसाद; ४० वेळा रक्तदान करणाऱ्या रवि मंडावारांसह रक्तवीरांचा गौरव!
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात सत्कार; अनेकांना जीवनदान देणाऱ्या रक्तदात्यांना मानवंदना...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नव्हे, तर एखाद्याला नवजीवन देणे होय. अपघात, प्रसूती, गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासल्यावर स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता मदतीसाठी धावून जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील रक्तदात्यांचा जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात नियमित रक्तदान करून समाजात माणुसकीचे जिवंत उदाहरण निर्माण करणाऱ्या रक्तदात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके, डॉ. इंद्रजीत नागदेवते, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मुकुंद ढबाले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, रक्तपेढी विभागाचे कर्मचारी, आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले ते लोकस्पर्श न्यूजचे कार्यकारी संपादक व ANI जिल्हा प्रतिनिधी रवि प्रभाकर मंडावार त्यांनी आजवर वयाच्या ३५ व्या वर्षी तब्बल ४० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवस असो, अपघातग्रस्त रुग्ण असो, गंभीर अवस्थेतील रुग्ण असो किंवा रक्तासाठी झुंज देणारी प्रसूत माता असो, रक्ताची गरज भासल्याची माहिती मिळताच कोणताही भेदभाव न करता मदतीसाठी धावून जाणारे रक्तदाता म्हणून त्यांची जिल्हाभर ओळख निर्माण झाली आहे. पत्रकारितेची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेले हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कनेरी येथील शिक्षक शरद गायकवाड यांनी १७ वेळा रक्तदान केले आहे. ते केवळ स्वतः रक्तदान करत नाहीत, तर युवकांना रक्तदानासाठी प्रेरित करून विविध सामाजिक आणि धार्मिक उत्सवांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतात.
जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारक म्हणून कार्यरत गजानन गेडाम यांनी वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ३५ वेळा रक्तदान करून समाजसेवेचे वेगळे उदाहरण घालून दिले आहे. नियमित रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात, या भावनेतून ते सातत्याने रक्तदान करीत आहेत.

प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक कर्तव्यही तितक्याच निष्ठेने पार पाडणारे जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. विविध ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी १५ वेळा रक्तदान केले असून गडचिरोलीत रुजू झाल्यानंतरही त्यांनी रक्तदानाची परंपरा कायम ठेवली आहे.
तसेच महेश भाकरे यांच्यासारखे अनेक युवा रक्तदाते अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांच्या मदतीसाठी नेहमीच सज्ज असतात. त्यांच्या तत्परतेमुळे अनेक कुटुंबांना संकटाच्या काळात दिलासा मिळाला आहे.
कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना अलीकडील एका गंभीर प्रसूती प्रकरणाचा उल्लेख केला. अहेरी येथील एका महिलेला प्रसूतीदरम्यान जीवघेण्या गुंतागुंतीचा सामना करावा लागला होता. तिचे प्राण वाचविण्यासाठी तब्बल २५ युनिट रक्त व रक्तघटकांची आवश्यकता भासली. डॉक्टरांचे अथक प्रयत्न, रक्तपेढीची तत्परता आणि स्वेच्छा रक्तदात्यांच्या योगदानामुळे त्या महिलेला नवजीवन मिळाले.
या उपचार प्रक्रियेत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे, डॉ. शशिकांत बद्देला, भुलतज्ज्ञ डॉ. सुकेशनी जीवने, डॉ. धनंजय खंडागळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मुकुंद ढबाले यांच्या समन्वयातून आवश्यक रक्त व रक्तघटक उपलब्ध झाले. तसेच प्राची भैसारे, गणेश साळवे आणि स्वप्निल चापले या तंत्रज्ञांनीही विशेष सहकार्य करत उपचार यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. डॉक्टर, रक्तपेढी कर्मचारी आणि रक्तदाते यांच्या समन्वित प्रयत्नांमुळेच त्या महिलेला नवजीवन मिळू शकले, असे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत अधिकाधिक युवकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. रक्ताच्या एका पिशवीमुळे एखाद्याचे आयुष्य वाचू शकते, एखाद्या आईच्या कुशीतले लेकरू अनाथ होण्यापासून वाचू शकते आणि एखाद्या कुटुंबाचा आधार टिकून राहू शकतो. म्हणूनच रक्तदान ही केवळ सेवा नसून माणुसकीचे सर्वोच्च रूप असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

