निवडणुका होतील….विकासाचं काय?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
निकेश आमने-पाटील ९४०३३३०३२४, (लेखक ग्रामविकास विभागात कार्यरत आहेत.)
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजलेले आहे आणि सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि आजही जवळपास ५५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहतात. अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी व्यवसाय आणि पर्यायाने ग्रामीण भाग आज विकासाच्या अजेंड्यावर तर दिसतो मात्र शहरी भागात विकास झाला तसा वेग ग्रामीण भागात दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा दिलेला संदेश विसरून शहराकडे चला हा मंत्र सर्वत्र दिसत आहे. शिक्षणासाठी खेड्यातून शहराकडे आलेली पिढी उच्च शिक्षण घेतल्यानंतर खेड्याकडे पाठ फिरवतांना दिसते. याच कारण त्याला शहरात मिळणाऱ्या भौतिक सुविधा खेड्यात नाहीत आणि गावकी-भावकीच्या राजकारणात गुंतून पडलेली गावे आणि विकासाबाबत सर्वत्र दिसून येत असलेली उदासीनता नव्या पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यात कमी पडत असल्याचे दिसते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात की,
गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा
गावची भंगता अवदशा, येईल देशा
गाव हा विश्वाचा घटक आहे, देशाचा मूळ पाया आहे. मात्र गावाची परिस्थिती आजही बदललेली दिसून येत नाही. गावे ओसाड पडत आहे. गावपातळीवर अनेक प्रश्न आहेत मात्र निवडणुकांमध्ये हिरीरीने सहभागी होणारी मंडळी, सरपंच पदासाठी बोली लावणारी, निवडून येण्यासाठी वाट्टेल ती करणारी, घरातला किंवा जातीतलाच उमेदवार पाहिजे म्हणून हट्ट धरणारी, दारू आणि पार्ट्या मिळतात म्हणून उत्साहाने निवडणुकीत सहभागी होणारी मंडळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावाच्या विकासासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही. या विपरित सामाजिक परिस्थितीचा ग्रामीण भागाच्या विकासावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येते. यामुळे आज ग्रामीण विकासाची नेमकी काय दिशा असावी.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ४० नुसार गावाचा कारभार चालावा व लोकशाही मार्गाने गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी ग्रामपंचायत असावी अशी तरतूद होती मात्र ७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देऊन बळकट करण्यात आले आहे. मात्र स्थानिक स्तरावर शासन म्हणून ग्राम पंचायतींना विकास कामे करण्याकरिता आर्थिक पाठबळ कमी पडत होते आणि सर्वार्थाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र चौदाव्या वित्त आयोगापासून ग्रामपंचायतीला स्थानिक स्तरावर जाणवणाऱ्या समस्या त्यांच्याच पातळीवर सोडविण्यासाठी थेट निधी उपलब्ध करुन दिला आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून गाव विकास आराखडे तयार करून ग्राम पंचायतींनी हा निधी खर्च करावयाचा आहे. सलग ५ वर्षे निश्चितपणे लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणाऱ्या निधीचे योग्य नियोजन झाले तर ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक समस्या सोडविण्यासाठी बऱ्याच अंशी मदत मिळते.
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज जगाच्या पातळीवर विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. भौतिक विकासाबरोबरच लोकांचे आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका या गरजांची सोडवणूक प्राधान्याने करणे महत्वाचे आहे या विचारातून निधी खर्च करण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. मुलभूत प्रश्न म्हणजे ढोबळमानाने आपण अन्न, वस्त्र, निवारा असे समजतो. या मुलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर मग मानवी विकासाच्या पातळीवरील विकासाची नांदी सुरू होते. यात सामाजिक सांमजस्याचे वातावरण कसे आहे, सामाजिक मुल्यांचा आदर कितपत केला जातो, लोकांचे मानसिक स्थैर्य वाढले आहे का?
लोकांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकास कितपत झाला आहे, लोक आनंदी आहेत का या बाबींचाही विकास या संकल्पनेत समावेश केल्या जातो. म्हणूनच ग्रामीण विकासाला योग्य ती दिशा असली पाहिजे. केवळ भौतिक प्रगती म्हणजे विकास नव्हे तर भौतिक, अधिभौतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास हा महत्वाचा आहे. या दृष्टीकोनातून ग्रामीण विकासाची दिशा ठरवतांना काही मानके ठरवणे गरजेचे आहे.
गावाचं बजेट कसं ठरतं तर प्रत्येक वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ग्राम सभेची बैठक बोलावली जाते. त्यामध्ये गावाच्या आरोग्य, शिक्षण, महिला विकास, अपंग कल्याण अशा वेगवेगळ्या गरजांवर विचार केला जातो. त्यानंतर या गरजा पूर्ण करण्यासाठी गावाकडे किती उपलब्ध निधी आहे आणि सरकारकडून किती अपेक्षित आहे, यासंबंधीचं एक अंदाजपत्रक तयार केलं जातं.“गावातल्या सगळ्या योजनांचं एकत्रित अंदाजपत्रक ३१ डिसेंबरपूर्वी पंचायत समितीला पाठवणं आवश्यक असतं. हे अंदाजपत्रक पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे व ती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवत असते.
याव्यतिरिक्त “एका गावाच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकार आणि इतर अशा ५०० पेक्षा जास्त योजना असतात. आता कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, हे ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं, कोणत्या भौगोलिक क्षेत्रात येतं, यानुसार ठरतं.” त्याप्रमाणे त्या योजना गावांना मागणी अनुसार मिळत असतात मात्र ग्रामीण विकासासाठी अनेक योजना असून देखील त्यांची अंमलबजावणी मात्र अजून देखील परिपूर्ण होत नाही. याचं महत्वाच कारण म्हणजे माहितीचा अभाव आणि जबाबदारी! ग्राम पंचायत निवडणुकीसाठी अधीर झालेली गावपातळीवरील नेते मंडळी आणि जनता देखील निकालानंतर गावाच्या विकासावर एकत्र येताना दिसत नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकांना अनन्य साधारण महत्व आहे आणि निवडणुका व्हायलाच हव्या. मात्र ग्राम पंचायतीच्या राजकारणात लोकांची मन कायमची दुभंगतात आणि याला अडवा त्याला जिरवा हा कार्यक्रम सुरु होतो. निवडणूक निकालानंतर एकदा विजयी जल्लोष संपला कि विरोधी पक्षातील सोडा मात्र निवडणुकीत विजयी मंडळींच्या बाजूची लोक देखील गाव विकासाचा प्रश्न येतो तेव्हा कुठे आहेत हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये दिसुन येते.
गावचा विकास करणे म्हणजे फक्त गावठाण अंतर्गत रस्ते आणि नाल्या करणे नव्हे तर ग्रामपंचायत गावठाणमधील सर्व महसुली गावाच्या वाड्या-वस्त्यामधील पायाभूत सुविधांचा विकास, यात कोणतीही छोटी वाडी व वस्ती वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायतीच्या परिसरातील व अखत्यारीतील सर्व नैसर्गिक संसाधनांचा जल, जंगल, जमीन, जनावरे आणि जनता या पाच ‘ज’ चा विकास अशी सर्वसमावेशक भूमिका स्विकारावी लागेल. ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्व व्यक्तीचा मानव विकास आरोग्य, शिक्षण व दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी गावाने एकत्र येऊन विविध शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करावी. यात विशेषतः गावाच्या पाणलोट क्षेत्राचा विकास, जलसंधारण, सिंचनाच्या सुविधा, पाणंदरस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्वच्छता आरोग्य आणि गावपातळीवरील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी गावाने शाळेसोबत एकत्र येऊन प्रयत्न करणे होय असे मला वाटते.
ग्रामविकासातून मानव विकासाकडे वाटचाल करताना गावातील प्रत्येक नागरिकास आरोग्यदायी आनंदी जीवन जगता यावे, असे वातावरण निर्माण करुन गावातील बालमृत्यू, कुपोषण कमी करणे, संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी तरतूद करणे आणि आरोग्य सुधारण्यासाठी कामे करावी लागतील. गावातील प्रत्येक नागरिक शिक्षित असावा जेणेकरुन तो स्वावलंबी होईल व सुज्ञपणे स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. यासाठी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे, शाळा गळती रोखणे यासाठी प्रयत्न करावे लागतील.
गावातील प्रत्येक नागरिकाला रोजगार, उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे जेणेकरून ते स्वावलंबी होतील व स्वत:च्या कुटुंबाची योग्य काळजी घेतील यासाठी स्वयंरोजगार व वेतनी रोजगारासाठी कौशल्यवृद्धीसाठी गावपातळीवर प्रशिक्षणाचे आयोजन करुन दरडोई उत्पन्नात वाढ करण्याकरिता नियोजन केले पाहिजे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहभागातून चार वर्षांच्या बृहद आराखड्यातीलच कामांची निवड वार्षिक विकास आराखड्यात करावयाची आहे म्हणून चार वर्षांच्या ग्राम विकास आराखड्याच्या निर्मितीत व अंमलबजावणीत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाची आवश्यकता आहे. मात्र सद्य परीस्थितीत निवडणुकांच्या काळात जोमात असलेली गावातील जनता निवडणुकीनंतर कोमात गेलेली असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे आणि स्वार्थी पदाधिकाऱ्यांचे फावते आणि गाव विकासाच्या प्रक्रियेपासून लांब जात असल्याचे दिसते.
खरतर गावकऱ्याना आरखडा तयार झाल्या नंतर त्यांच्या बदलत्या गरजांप्रमाणे त्यात फेरबदल करायचे असतील तर त्याला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेऊन तो बदलता येत असतो. गावातील समस्यांचा अचूक वेध घेत त्या सोडविण्याच्या उपाय योजनांचा आराखड्यात समावेश करता येत असतो व त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी गावाच्या व नागरिकांच्या विकासाची वर्तमान व भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे.
महात्मा गांधींचे आदर्श भारतीय ग्राम हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने आतापर्यंत अनेक योजना सुरू करण्यात आल्या मात्र आतापर्यंत किती ग्रामपंचायती समृद्ध किंवा आदर्श झाल्यात हा प्रश्न आहे. अजूनही आपल्याला बोटावर मोजता येतील इतकी उदाहरण दिसून येतात. मग २८ हजार ग्रामपंचायतींच काय? ‘आमचा गाव, आमचा विकास’ फार काही कुठे बघण्यास मिळत नाही अजूनही ते फक्त कागदावर दिसून येते. गावातील निवडणूक ही कुटुंबाच्या प्रतिष्ठासाठी होते. गावातील विकासाची दृष्टी फार काही नसते त्यामुळे कदाचित ग्रामीण स्तरावर आलेला निधी देखील पूर्ण खर्च होत नाही. झाला तरी योग्य पद्धतीने होत नाही. आज मात्र ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूकसाठी उभे असलेल्या उमेदवारांनी किमान आपल्या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून ‘आमचा गाव, आमचा विकास’ ही संकल्पना राबवून गाव समृद्ध केल्यास गावांचा कायापालट नक्की होईल. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि मांडलेली भूमिका एकविसाव्या शतकातही तितकीच उपयोगी आहे.
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र।
सज्जनांनी व्हावे एकत्र
संघटना हेचि शक्तीचे सूत्र।
ग्रामराज्य निर्माण करी
राष्ट्रसंताच्या वरील उक्तीप्रमाणे गावातील सज्जनांनी एकत्र येत निवडणुकांमध्ये विजयी होण्याच्या आव्हानाबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासाचं आव्हान पेलण्यासाठी गावातील युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
Comments are closed.