RTE विद्यार्थ्यांकडून फी मागितली तर थेट तक्रार करा;दोषी शाळांवर कारवाईचा इशारा…
शिक्षण विभाग सतर्क..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क आकारू नये, असे स्पष्ट करत शुल्काची मागणी करणाऱ्या शाळांविरोधात पालकांनी तात्काळ शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) Babasaheb Pawar यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. शासनाच्या ऑनलाइन प्रक्रियेनंतर लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर संबंधित शाळांकडून कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम प्रवेश निश्चित करण्यात येतो.
या योजनेअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केले जाते. त्यामुळे पालकांकडून कोणतेही शुल्क घेण्याचा अधिकार शाळांना नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
तरीही काही शाळांकडून शुल्काची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने पालकांनी अशा प्रकारांना बळी न पडता पुराव्यासह गटशिक्षणाधिकारी किंवा जिल्हा नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारींसाठी ९८२३०१२६९१ या क्रमांकावर संपर्क साधता येणार असून ssagadchiroli@gmail.com या ई-मेलवरही माहिती पाठविता येणार आहे. प्राप्त तक्रारींची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

