वर्ध्यात डाव्या चळवळीचा एल्गार: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांत लाल झेंडा फडकविण्याचा माकपचा निर्धार
‘लाल सलाम’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला; प्रस्थापित राजकारणाविरोधात आक्रमक संघर्षाची हाक...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी वर्धा : भांडवली व्यवस्थेच्या रेट्यात भरडल्या जाणाऱ्या शेतकरी, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) विदर्भाच्या भूमीतून परिवर्तनाचे रणशिंग फुंकले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित राजकारणाला सुरुंग लावून राजकीय पटलावर सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व प्रस्थापित करण्याचा आणि लाल झेंडा फडकविण्याचा एकमुखी संकल्प आज येथे पार पडलेल्या विदर्भव्यापी संमेलनात करण्यात आला.

वर्ध्यातील संमेलनस्थळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. प्रमुख नेत्यांचे व्यासपीठावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘लाल सलाम’ आणि ‘इंकलाब झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.
प्रस्थापित राजकारणाचे अधःपतन; स्वच्छ पर्यायाची गरज: कॉ. अशोक ढवळे…
संमेलनाला मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते कॉ. अशोक ढवळे यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर घणाघाती टीका केली. देशातील आणि राज्यातील मुख्य प्रवाहातील पक्षांनी नीतिमत्ता आणि लोकशाही मूल्यांचे अधःपतन केले असून, सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न राजकारणाच्या परिघाबाहेर फेकले गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. जनसामान्यांच्या जगण्याचे प्रश्न केंद्रस्थानी आणून राजकारण स्वच्छ करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आता डाव्या आणि पुरोगामी चळवळीवर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांत ताकदीने उतरणार..
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम केली जाणार आहे. जनआंदोलनांची ऊर्जा राजकीय लढ्यात रूपांतरित करून जनसामान्यांना निर्णायक नेतृत्व मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
संमेलनाला कॉ. मय्सिम ढवळे, कॉ. डी. डी. कराड, कॉ. नरसय्या आडम (आडम मास्तर), कॉ. जे. पी. गावित, कॉ. अजित नवले, आमदार कॉ. विनोद निकोले, कॉ. लाटकर, कॉ. अमोल मारकवार, कॉ. अरुण भेलके यांच्यासह विदर्भातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

