राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई 29 जानेवारी:- कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबात परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील लॉकडाऊन 31जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यात पुन्हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालील सूचनांचं पालन करणं आश्यक आहे.
- सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
- सामाजिक अंतर राखणं गरजेचं
- सतत हात धुणे आवश्यक
नव्या स्ट्रेनमुळे लॉकडाऊनमध्ये वाढ
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे तीन प्रकार समोर आले होते. जगभरातील अनेक देशांत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळले होते. राज्यातही नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.