मराठी साहित्य संमेलन: परंपरा आणि प्रवाह
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
साहित्य संमेलन हे अक्षरनिष्ठांची मांदियाळी असून लेखक, वाचक आणि रसिक यांचा मेळ घडवून आणणारा आनंददायी सोहळा आहे. या संमेलनांमुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध होत गेले आहे. ग्रंथप्रसार व्हावा, साहित्यविषयक चर्चा व्हाव्यात आणि लेखक-वाचक यांच्यातील संवाद वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यातील इतर तत्त्वचिंतकांच्या मदतीने इ.स. १८७८ मध्ये पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन आयोजित केले. हे संमेलन मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीचे पायाभूत कार्य समजले जाते. त्यानंतर १८८५ मध्ये दुसरे संमेलन आणि १९०५ मध्ये साताऱ्यात तिसरे संमेलन आयोजित करण्यात आले. १९०६ मध्ये पुण्यात झालेल्या चौथ्या संमेलनात ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ स्थापन झाली आणि पुढील संमेलने घेण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली.
यथाक्रम, ग्रंथकार संमेलने हे नाव बदलत गेले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने हे संमेलन ओळखले जाऊ लागले. या संमेलनांमध्ये साहित्यिक आपल्या मनातील तीव्र भावना मांडतात, विचारमंथन करतात आणि मराठी साहित्याच्या भविष्यासाठी मार्गदर्शन करतात.
महिला साहित्यिकांचा गौरव
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान आजपर्यंत सहा महिलांना मिळाला आहे. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. अरुणा ढेरे आणि यावर्षीच्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या साहित्यिक योगदानाने मराठी साहित्याला नव्या दिशेने नेले आहे. महिला साहित्यिकांनी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून आपल्या लेखनकौशल्याने आणि विचारांनी मराठी साहित्यात महत्त्वाची भर घातली आहे.
बोलीभाषांचे महत्त्व आणि झाडीबोली साहित्य
मराठी ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक असून, तिच्या विविध बोलींनी तिला अधिक समृद्ध केले आहे. अलीकडे बोलीभाषांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लेखक, अभ्यासक आणि शासन यांच्याकडून बोलीभाषांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. झाडीबोलीसाठी स्वतंत्र साहित्य संमेलन आयोजित केले जाते. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे झाडीबोली कला दालनाची स्थापना होणार आहे. याशिवाय, झाडीपट्टी रंगभूमीची नाटके महाराष्ट्रभर विशेषतः मुंबईपर्यंत पोहोचत आहेत.
अनुवादाचे योगदान
मराठी साहित्यात अनुवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठी साहित्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात विविध भाषांतील साहित्याचे अनुवादित स्वरूप प्रकाशित होत होते. आजकाल मराठी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यावर अधिक भर दिला जात आहे. यासाठी शासनही विशेष प्रयत्नशील आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: एक ऐतिहासिक पर्वणी
यावर्षीचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीतील तालकटोरा येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या गीताच्या ओळींना साजेसा हा ऐतिहासिक क्षण पहिल्या बाजीरावाच्या काळात अनुभवला गेला होता. यापूर्वी १९५४ साली दिल्ली येथे ३७ वे संमेलन झाले होते. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्याचा हा महासोहळा राजधानीत भरत आहे. विशेषतः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
या संमेलनाच्या गीताचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनात करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या गीतात महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला आहे.
संमेलनातील महत्त्वाचे विषय
या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये – अनुवादित साहित्याचे महत्त्व, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन व साहित्य, ‘आनंदी गोपाळ’ विषयावर विशेष सत्र तसेच, बहुभाषिक कवी संमेलनही होणार आहे.
साहित्य संमेलन आणि मराठीचा विकास
साहित्य संमेलन कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. काही वेळा त्यावर टीका होते, परंतु अशा संमेलनांमुळे मराठी साहित्य अधिक प्रवाही होते आणि भाषेचा विकास घडून येतो. साहित्य संमेलन हे फक्त लेखक आणि वाचक यांचे नव्हे, तर संपूर्ण मराठी समाजाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देते.
Comments are closed.