कोत्तापेल्लीत विभक्त महिलेचा संशयास्पद मृत्यू : दोन चिमुरड्यांचे भविष्य अंधारात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरेल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोत्तापेल्ली गावात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रजिता सडवली मोर्ला (वय अंदाजे ३८) या महिलेचा काल रात्री अज्ञात व्यक्तीने गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोत्तापेल्लीसह परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजिता यांचा काही दिवसांपूर्वी त्यांच्या पती सडवली मोर्ला यांच्याशी विभक्त होऊन वेगळे वास्तव्य सुरू होते. या दाम्पत्याला हरिश (१३) आणि शिरीषा (११) ही दोन अपत्ये असून ते दोघेही आता मातृस्नेहास पारखे झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच आसरेल्ली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरोंचा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणाने आणि कुणी केली याबाबत अद्याप स्पष्टता नसून, पोलिस विविध अंगांनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आसरेल्लीचे प्रभारी अधिकारी समाधान दौड, पोलिस उपनिरीक्षक निखिल मेश्राम, पीएसआय प्रसाद पवार आणि इतर कर्मचारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या हत्येमागे कौटुंबिक कारण, वैयक्तिक वाद, मालमत्तेचा वाद, की इतर काही कारण, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून गावातील काही संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, लवकरच गुन्हेगारांचा छडा लागेल, असा विश्वास पोलिस विभागाने व्यक्त केला आहे.
Comments are closed.