महाविकास आघाडीचे सरकार येत्या वर्षात राज्यातील संपूर्ण रिक्त जागा भरणार – ना. विजय वडेट्टीवार यांची माहिती
गडचिरोली, दि, २९ डिसेंबर: येत्या वर्षात राज्यातील संपूर्ण रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन तथा बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज कुरखेडा येथे दिली.
तालुका काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित नगरपंचायत व ग्रामपंचायत ग्रामीण कार्यकर्ता व चर्चासत्र मेळाव्यादरम्यान आयोजित नागरी सत्काराला उत्तर देतांना वडेट्टीवार बोलत होते. पुढे बोलताना ना. वडेट्टीवार यांनी सांगितले की कोरोनामुळे राज्याची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील प्राध्यापकांना वेतन देऊ शकलो नाही मात्र पुढील आर्थिक वर्षात प्राध्यापकांना नक्की वेतन मिळणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
काँग्रेसने तयार केलेल्या देशातील रेल्वे विमानतळ विकण्याचे कार्य सध्याची देशातील भाजपाची सरकार करीत असल्याची टीका केली जिल्ह्यातील रेल्वेसाठी केंद्र सरकारने प्रथम आपला अर्धा वाटा दिल्यानंतरच राज्य सरकार अर्धा वाटा देणार आहे येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुरखेडा नगरपंचायत मध्ये बहुमताने काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास राज्य सरकारकडून 25 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते याप्रसंगी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अॅड. अभिजित वंजारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, कुरखेडा कोरची नगरपंचायत निवडणुकीचे निरीक्षक योगेंद्र भगत, माजी आ. आनंदराव गेडाम यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील, कोरेटी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, कुरखेडा नगरीचे प्रथम नगराध्यक्ष डॉक्टर महेंद्र मोहबंसी, कुरखेडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत हरडे, कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामलाल मडावी, मनोज अग्रवाल, माजी उपाध्यक्ष जीवन पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, नगराध्यक्षा आशाताई तुलावी व अन्य मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी कुरखेडा व कोरची येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचा पक्षाचा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेश हारगुडे यांनी केले प्रास्ताविक जीवन पाटील नाट यांनी तर जयंत हरडे यांनी आभार मानले
Comments are closed.