१४ वर्षीय मुलाच्या मृत्यूने नागेपल्ली हादरले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मदर तेरेसा नगरातील हृदयद्रावक घटना; कारण अस्पष्ट, पालकांना मानसिक आधाराची गरज...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : नागेपल्ली परिसरातील मदर तेरेसा नगरात एका १४ वर्षीय मुलाचा रविवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या या अल्पवयीन मुलाच्या अचानक मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून, त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी मुलाचे आई-वडील प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. त्यावेळी तो घरी एकटाच होता. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. काही वेळाने पालक घरी परतल्यानंतर त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच पालकांनी आक्रोश केला. त्यांचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
मुलाने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अल्पवयातच एका होतकरू मुलाचा अशा पद्धतीने जीवनप्रवास संपल्याने परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, अहेरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अशा दुःखद प्रसंगी कुटुंबीयांना केवळ सांत्वनाचे शब्द नव्हे, तर मानसिक आणि भावनिक आधाराचीही नितांत गरज असते. विशेषतः पालकांनी आपल्या मुलाला गमावल्याने निर्माण झालेली पोकळी अत्यंत वेदनादायी असते. त्यामुळे कुटुंबीयांना समजून घेत त्यांच्याशी संवेदनशीलतेने संवाद साधणे आणि आवश्यक असल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याबाबतही कुटुंब, शाळा आणि समाजाने अधिक संवेदनशील राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

