Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रुग्णवाहिका नाही, वीजही गेली; गडचिरोलीत नवजात बाळाच्या मृत्यूने आरोग्य व्यवस्था पुन्हा कटघऱ्यात

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयातील महिला व बाल रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न होणे, उपचारादरम्यान वीजपुरवठा खंडित होणे आणि बॅकअप यंत्रणाही बंद पडल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने संताप व्यक्त होत आहे.

कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील संजना संदीप कुमरे (२३) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर ११ मे रोजी गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही तासांतच बाळाची प्रकृती खालावू लागल्याने डॉक्टरांनी सायंकाळी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र, जिल्हा मुख्यालयातही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली. ‘१०८’ आपत्कालीन सेवेशी संपर्क साधल्यानंतर वाहन पोहोचण्यास किमान दोन तास लागतील, असे सांगण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दीड तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न मिळाल्याने अखेर बाळाला नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

दरम्यान, उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याचा आरोप बाळाचे वडील संदीप कुमरे यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दीड तास वीज नसताना बॅकअपसाठी असलेली इन्व्हर्टर यंत्रणाही बंद पडली. परिणामी व्हेंटिलेटर बंद झाले आणि ऑक्सिजनअभावी बाळाचा मृत्यू झाला. या आरोपांमुळे रुग्णालय प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर योग्य पर्यायी व्यवस्था का नव्हती, असा सवाल नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांना केला असता, “मला काही विचारू नका, व्यवस्थापनालाच विचारा,” असे उत्तर मिळाल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या संदर्भात संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

दरम्यान, महिला व बाल रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक Prashant Pendam यांनी उपचारात हलगर्जी झाल्याचा आरोप फेटाळला आहे. मुदतपूर्व प्रसूतीमुळे बाळाचे वजन कमी होते आणि प्रकृती अत्यंत नाजूक होती. उपचारात कोणतीही त्रुटी झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, डॉक्टरांकडून नातेवाईकांशी अयोग्य संवाद झाला असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासिर हाश्मी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. “जर रुग्णालयात उपचार शक्य होते, तर चंद्रपूरला रेफर करण्याचा निर्णय का घेण्यात आला? रुग्णवाहिका वेळेत का उपलब्ध झाली नाही? नातेवाईकांचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.