Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब!! आता न्यायाधीशच्या जागी मशीन लावणार निकाल!

चिनी तंत्रज्ञान कंपन्यांनी जगातल्या पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारा न्यायाधीश केला तयार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था, २९ डिसेंबर : जगभरात निरनिराळ्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे; मात्र तरीही आतापर्यंत मानवी भावना, सद्सद्विवेकबुद्धी आवश्यक असलेल्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलेला नव्हता. चीनने  मात्र आतापर्यंत कोणी विचारही केला नसेल अशा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाला धक्का दिला आहे. चीनने चक्क न्यायदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरुवात केली असून, चिनी तंत्रज्ञान कंपन्यांनी जगातला पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारा न्यायाधीश (world’s first artificial intelligence-powered prosecutor) तयार केला आहे.

शांघाय पुडॉन्ग पीपल्स प्रोक्युरेटोरेटनं हा यांत्रिक न्यायाधीश विकसित केला आहे. हा यांत्रिक न्यायाधीश सादर करण्यात आलेले पुरावे, युक्तिवाद आणि वादविवादाच्या आधारे निर्णय देईल. या यांत्रिक न्यायाधीशाचे निर्णय ९७ टक्क्यांपर्यंत योग्य असल्याचा दावा चीननं केला आहे.

या यांत्रिक न्यायाधीशांमुळे न्याय यंत्रणेवरील कामाचा ताण कमी होईल आणि गरज पडल्यास न्यायाधीशांच्या ऐवजी या यंत्रांचा वापर करता येईल, असा दावाही करण्यात आला आहे. डेस्कटॉप संगणकाद्वारे (Desktop Computer System) या यंत्रणेचा वापर करणं शक्य असून, एकाचवेळी अब्जावधी गोष्टींची माहिती यात साठवून ठेवता येते. या सगळ्या माहितीचं विश्लेषण करून निर्णय देण्यासाठी हा यांत्रिक न्यायाधीश सक्षम आहे. हा यांत्रिक न्यायाधीश विकसित करण्यासाठी वर्ष २०१५  ते २०२०  पर्यंतच्या हजारो खटल्यांचा वापर करण्यात आला आहे. क्रेडिट कार्ड फसवणूक, सट्टेबाजी अशा विविध प्रकरणांमध्ये हा योग्य निर्णय देऊ शकतो, असा दावाही करण्यात आला आहे.

या नव्या शोधामुळे न्याययंत्रणेत खळबळ माजली असून, अनेकांनी न्यायदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत भीती व्यक्त केली आहे. याबाबत साउथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना एका न्यायाधीशाने भीती व्यक्त केली, की ‘हा यांत्रिक न्यायाधीश ९७ टक्के योग्य निर्णय देऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. याचाच अर्थ या यांत्रिक न्यायाधीशाचे निर्णय चुकण्याची शक्यता आहेच. मग अशा परिस्थितीत चुकीचा निर्णय झाला तर त्याला न्यायाधीश, मशीन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोण जबाबदार असेल? यंत्र चुका शोधू शकतं. परंतु निर्णय घेण्यासाठी माणसाच्या जागी यंत्र हा पर्याय ठरू शकत नाही.’

चीनमधल्या या शोधामुळे जगभरातही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर न्यायदान यंत्रणेत केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे न्याय यंत्रणेवरचा ताण कमी होईल की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याची शक्यता आणखी दुरापास्त होईल, हे आताच सांगणं कठीण आहे.

हे देखील वाचा : 

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास तुर्तास स्थगीती…

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व ॲक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

Comments are closed.