Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन

देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे डेस्क, दि. २५ डिसेंबर : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जिओटीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘पढेगा भारत’ चॅनेलचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राष्ट्रीय विमुक्त जाती भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर उषा ढोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी खासदार डॉ. अमर साबळे, ‘पढेगा भारत’ च्या अध्यक्षा वेणू साबळे आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कल्पना करायची असेल तर उच्च दर्जाची करावी, असे सांगून राज्यपाल म्हणाले, साहसाचा संकल्प केला तर आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे काम घडू शकते. माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी साहसवादाचे कृतीशील उदाहरण घालून दिले. आता पाश्चात्य देशांपेक्षा आपल्या संस्कृतीकडे जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. मुले ही आपल्यासाठी देवासमान असून त्यांना आपल्याला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी आभासी ‘डिजिटल’ सोबतच प्रत्यक्ष अशा ‘व्हिजिटल’ अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब करावा लागेल, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

‘पढेगा भारत’ हे चॅनेल शिक्षणासाठी महत्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सांस्कृतिक संवर्धनासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स बरोबरच अध्यात्मिक इंटेलिजन्सलाही महत्व द्यावे लागेल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. कराड म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्यात जो अधिक स्पर्धात्मक राहील तोच पुढे जाईल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपली प्रगती होणार असून ‘पढेगा भारत’ने हे ज्ञानदानाचे पवित्र काम उत्कृष्ट पद्धतीने करून चांगले डॉक्टर, प्राध्यापक, तंत्रज्ञ, उद्योजक आदी सर्वच क्षेत्रातील लोक घडवावेत. दूरचित्रवाणी हे दृकश्राव्य माध्यम असून त्याचा शिक्षणासाठी अधिक चांगला उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

डॉ. माशेलकर म्हणाले, अल्प खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाचा विस्तार, वेग, शाश्वतता, गुणवत्ता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ बरोबरच ‘राईट एज्युकेशन’ आणि ‘राईट वे ऑफ एज्युकेशन’ हे आताच्या काळात महत्वाचे ठरणार आहे. कृतिशील, गतिशील शिक्षणाद्वारे ज्ञानाबरोबरच व्यक्तिसंवर्धन आणि मूल्यवर्धन घडवायचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. तंत्रज्ञानाच्या सहकार्याने हे शक्य होत आहे. बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वास यातूनच नवी पिढी घडणार आहे, असेही ते म्हणाले.

श्री. इदाते म्हणाले, गौतम बुद्धांची प्रज्ञा, शील आणि करुणा ही तत्वे आत्मसंवर्धनासाठी महत्वपूर्ण आहेत. शिक्षणातील महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे कार्य मार्गदर्शक आहे. त्या मार्गावर चालत अमर साबळे यांनी सुरू केलेले ‘पढेगा भारत’ अभियान शिक्षणाला व्यापक स्वरूप देईल असेही ते म्हणाले.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोव्हिड काळात शिक्षण ठप्प झाले आणि आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळून त्याचे स्वरूप व्यापक केले. शालेय शिक्षण ते उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. केवळ डिजिटल नव्हे तर दर्जेदार शिक्षण यातून मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी वेणू साबळे यांनी स्वागत करून पढेगा भारतच्या कामाचा आढावा घेण्यासह आज उद्घाटन झालेल्या नवीन चॅनेलची माहिती दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, जिओ चे प्रतिनिधी दीपक शिवले आदी यावेळी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

ओमिक्रॉनचा धोका वाढला, राज्यात नवे नियम, शाळांचं काय होणार? – आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं सविस्तर स्पष्टीकरण

भीषण अपघात! दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक; धडकेत एक जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी

टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका सुरुच

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.