जीव मुठीत धरून डोंग्याने प्रवास संपणार कधी? चपराळा देवस्थान विकासासोबत उंच पुलासाठी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे!
नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने पुराच्या पाण्यातून शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना चक्क ‘डोंग्याचा’ (नावेचा) वापर करावा लागतो, ज्यामुळे जीवितहानीचा धोका कायम असतो....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मौजा चपराळा येथील पुरातन प्रशांतधाम देवस्थान व हनुमान मंदिर परिसराला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भेट देऊन विकास- कामांची सविस्तर पाहणी केली. खमनचेरु आश्रमशाळेच्या पाहणीनंतर त्यांनी या भागाचा दौरा करत भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, परिसर विकास आणि सुशोभीकरणाची सर्व कामे दर्जेदार तसेच विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश संबंधित शासकीय यंत्रणांना दिले. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर चपराळा-चौडमपल्ली मार्गावरील नाल्यावर तातडीने उंच पिलरचा पूल व पक्का रस्ता मंजूर करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ३५३-सी पासून अवघ्या ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेला हा मार्ग बारमाही वर्दळीचा मानला जातो. चपराळा येथील पुरातन प्रशांतधाम मंदिरात श्रावण मास, गोकुळाष्टमी व नवरात्रोत्सवाच्या काळात विदर्भासह इतर भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. तसेच या परिसरात ब्रिटिशकालीन विश्रामगृह असून तेथे विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची ये-जा असते. मात्र, चपराळा-चौडमपल्ली मार्गावरील नाल्यावरील पूल अत्यंत कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे हा संपूर्ण रस्ता जलमय होतो.
पावसाळ्यात संपर्क तुटल्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना शेतीच्या कामाकरिता तसेच दैनंदिन ये-जा करण्यासाठी जीव मुठीत धरून डोंग्याने (नावेने) प्रवास करावा लागतो. यामुळे येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जात आहे. पुरामुळे अनेकदा अधिकारी व भाविकांनाही आल्या पावली निराश होऊन परतावे लागते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने देवस्थानच्या विकासासोबतच चपराळा-चौडमपल्ली नाल्यावर तातडीने उंच पिलरचे पूल व रस्त्याचे बांधकाम मंजूर करावे, अशी मागणी समस्त चपराळा ग्रामवासीयांच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रशांतधाम’ परिसराचा वेगाने होणार कायापालट..
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चपराळा देवस्थान परिसरात सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित यंत्रणांना खडे बोल सुनावत पुढील महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

