इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला पडलं चांगलंच महागात!
औरंगाबादेतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर केले अपलोड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
औरंगाबाद, ७ जानेवारी: इन्स्टाग्रामवरील अनोळखी तरुणाशी ओळख करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणाने पीडित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलीची एप्रिल २०१९ मध्ये इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे संवाद वाढत गेल्यानंतर, आरोपीनं पीडित मुलीचा विश्वास संपादन केला. ओळख वाढवून तिच्या नातेवाईकांशी मोबाइलवर गोड बोलून घेतले. तसेच तिला फोटो पाठवायला भाग पाडलं. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले.
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीचा मोबाइल हॅक करत सर्व डेटा चोरला. तसेच ‘सोशल मीडियावर होणारी बदनामी थांबवायची असेल तर दोन लाख रुपये दे’ अशी मागणी आरोपीनं पीडितेकडे केली.
यानंतर पीडित तरुणीने सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला आहे. हा प्रकार कळताच पीडित तरुणीच्या वडिलांनी तातडीने सीटी चौक पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील arbazz_007 नावाच्या प्रोफाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हे देखील वाचा :
Comments are closed.