‘मुक्त आनंदघन’ चा ‘मन’ दिवाळी अंक प्रकाशित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नेरूळ: साहित्य, संस्कृती आणि संतसाहित्य विषयक आशयसंपन्न, दर्जेदार, संग्राह्य अंकांची समृद्ध परंपरा असलेल्या मुख्य संपादक डॉ. देवीदास पोटे आणि कार्यकारी संपादक आजित आचार्य संपादित ‘मुक्त आनंदघन’ च्या ‘मन’ या विषयावरील दिवाळी अंकाचे प्रकाशन मानसशास्त्रज्ञ आणि संमोहन चिकित्सक डॉ. सुकुमार मुंजे, सह व्यवस्थापकीय संचालक मराठी चित्रपटसृष्टी डॉ. धनंजय सावळकर, लेखक – समीक्षक शिवाजी गावडे, कवी, लेखक गजआनन म्हात्रे, जेष्ठ नागरिक संघ, नेरूळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर आणि सीबीआय अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक भवन, नेरूळ येथे रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विलास राजूरकर यांनी स्वागतगीत सादर केल्यानंतर डॉ. देविदास पोटे यांनी सतत पस्तीस वर्षे संत साहित्याला वाहिलेले दिवाळी अंक प्रकाशित करण्यामागील आपली भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि माहितीपूर्ण निवेदन डॉ. वर्षा चौरे यांनी केले. याप्रसंगी डॉ. सुकुमार मुंजे यांनी बहिर्मन आणि अंतर्मनाचा विचार मांडताना “माणसाच्या अतीविचार करण्याच्या प्रवृत्तीमुळे मनावरचे ताण वाढत आहेत, त्यामुळे आजारांना सामोरे जावे लागते,” असे सांगून त्यासाठीं ध्यानधारणा हा चांगला उपाय असल्याचे सांगितले. तर डॉ. धनंजय सावळकर यांनी अशांत मनाचा प्रवाह कसा रोखावा हे सांगताना मन शांत करण्यासाठी विपश्यना आणि योगासारखी साधना करायला हवी, असे मत व्यक्त केले. लेखक, समीक्षक शिवाजी गावडे यांनी एकच विषय घेवून अंक काढणे सोपे नसते असे सांगून मुक्त आनंदघनचा ‘मन’ विषयक दिवाळी अंक माहितीपूर्ण असून तो वाचनीय, संग्रहानीय तर आहेच; पण तो अभ्यास करण्याजोगा आणि प्रबंध लिहिणाऱ्याना संदर्भग्रंथ म्हणूनही उपयोगी असल्याचे विषद केले.
प्रचंड उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ऍड अभिमान पाटील, रायगड जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ रत्नाकर काळे, सह आयुक्त जी एस टी डॉ. शिवाजी पाटील, वरिष्ठ हृदयरोगतज्ञ डॉ . केशव काळे, पद्मा संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण गावडे, सह महाव्यवस्थापक पशुसंवर्धन विभाग बी.एम.सी. डॉ मनोज माने, सखा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सखाराम गारळे, हाजी शाहनवाज खान, जनसेवा ट्रस्टचे अध्यक्ष इम्रान शेख हे मान्यवर उपस्थित होते . त्यांनीही मुक्त आनंदघन दिवाळी आंकाबाबत आपले विचार मांडले.

Comments are closed.