Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिनागुंडात प्रशासनाची थेट धडक; दुर्गम भागातील योजनांना मिळाली नवी गती

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनंतर तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय; वनपट्टेधारकांना फार्मर आयडीपासून घरकुल योजनांपर्यंत मार्गदर्शन....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात प्रशासनाने पुन्हा एकदा थेट गावपातळीवर पोहोचत विकास योजनांच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यानंतर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्त क्षेत्रभेट घेत ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत विविध समस्या ऐकून घेतल्या.

तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या क्षेत्रभेटीत बिनागुंडा गावातील गोटूलमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. कुवा कोडी, तुरेमर्का आणि फोदेवाडा या दुर्गम गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रशासनासमोर स्थानिक प्रश्न मांडले. पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, वनहक्क, ग्रामपंचायत स्तरावरील कामे आणि शासकीय योजनांचा लाभ यांसंदर्भातील अडचणी यावेळी चर्चेत आल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सभेदरम्यान वनपट्टेधारकांना ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. भविष्यातील कृषी अनुदान, विमा, पीकसहाय्य तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासोबतच घरकुल योजना, आरोग्य सुविधा, वन विभागाच्या योजना आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रमांची माहितीही ग्रामस्थांना देण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ग्रामस्थांनी मांडलेल्या अनेक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना देण्यात आल्या, तर काही विषय वरिष्ठ पातळीवर पाठवून समन्वयातून सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासन पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा संयुक्त क्षेत्रभेटी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या दौऱ्यात गटविकास अधिकारी वानखेडे, क्षेत्रीय वन अधिकारी अमर भिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष धाकटे, पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक आणि कोतवाल उपस्थित होते…

Leave A Reply

Your email address will not be published.