युद्धजन्य सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून सात तालुक्यांत होणार पुरवठा; अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना प्रथम प्राधान्य...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, : संभाव्य आपत्कालीन आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना स्वयंप्रकाश आणि दिवाबत्तीची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी तब्बल ४८ हजार लिटर अतिरिक्त केरोसीन मंजूर केले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत हे केरोसीन सात तालुक्यांमध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या नियोजनानुसार गडचिरोली तालुक्यास सर्वाधिक १२ हजार लिटर केरोसीन देण्यात आले असून, चामोर्शी, धानोरा, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यांसाठी प्रत्येकी ६ हजार लिटर केरोसीनचा साठा मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात अजूनही अनेक कुटुंबे दिवाबत्ती आणि स्वयंपाकासाठी पर्यायी साधनांवर अवलंबून असल्याने शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा अतिरिक्त साठा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः दुर्गम आणि वीजपुरवठ्याच्या अडचणी असलेल्या भागांमध्ये या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वितरणात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधारक तसेच गॅस जोडणी नसलेल्या कुटुंबांनाही केरोसीन वितरित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे यांनी नागरिकांना आवाहन करताना, आवश्यकतेनुसार नजीकच्या अधिकृत केरोसीन विक्रेत्याकडून केरोसीन प्राप्त करून शासनाच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे म्हटले आहे.
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून शासनाने घेतलेला हा निर्णय ग्रामीण भागातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

