Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिंहस्थाच्या आध्यात्मिक तेजाला नवे प्रतीक

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे सह्याद्रीत अनावरण; देशभरातील ३ हजारांहून अधिक डिझाइन्समधून अंतिम निवड....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीची नवी किनार लाभली आहे. कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याने आगामी सिंहस्थाच्या भव्य आयोजनाची औपचारिक नांदी झाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशव्यापी स्पर्धेतून निवडण्यात आलेले हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पवित्र भूगोल यांचे आधुनिक दृश्यरूप मानले जात आहे. भगवान शंकराच्या त्रिशूळापासून ते त्र्यंबकेश्वर मंदिराच्या स्थापत्यछटांपर्यंत, तसेच गोदावरीच्या पावित्र्यापासून काळाराम मंदिराच्या प्रतीकात्मकतेपर्यंत विविध घटक या लोगोमध्ये प्रभावीपणे गुंफण्यात आले आहेत.

कुंभमेळा प्राधिकरण, ‘मायगव्ह’ आणि ‘असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ३ हजार ६७ प्रवेशिकांमधून अंतिम बोधचिन्हाची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, यात ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचाही सहभाग होता. महाराष्ट्रातून सर्वाधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, दिल्ली आणि तामिळनाडू पुढील क्रमांकावर राहिले. १८ ते २४ वयोगटातील तरुणांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या स्पर्धेत पुण्यातील सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक पटकावत तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. नोएडा येथील मयांक नायक यांनी द्वितीय, तर पंढरपूरच्या पीयूष पिंपळनेरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिघांनाही धनादेश, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र प्रदान करण्यात आले.

डिझाइन क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांची समिती या निवड प्रक्रियेसाठी कार्यरत होती. प्रसिद्ध गीतकार आणि ब्रँड तज्ज्ञ Prasoon Joshi यांच्यासह अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे-देशमुख, बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे या तज्ज्ञांनी प्रवेशिकांचे परीक्षण केले. सर्जनशीलता, नावीन्य, सांस्कृतिक सुसंगती आणि दृश्य प्रभाव या निकषांवर आधारित अंतिम निवड करण्यात आली.

कार्यक्रमात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शेंदरराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते. विविध आखाड्यांतील साधू-संतांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव लाभले.

यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित संत-महंतांचे स्वागत करत सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे जागतिक दर्शन असल्याचे अधोरेखित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.