Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्लापल्लीच्या अनन्याची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत झेप

१० मीटर एअर पिस्तोल प्रकारात उल्लेखनीय कामगिरी; जूनमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आजच्या स्पर्धात्मक युगात खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही, तर तो व्यक्तिमत्त्व घडविणारा, एकाग्रता वाढविणारा आणि संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद देणारा जीवनमंत्र ठरत आहे. आर्थिक, भौगोलिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत एखादा विद्यार्थी जेव्हा लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने मेहनत घेतो, तेव्हाच यशाची खरी दिशा निर्माण होत असते. अनन्याचा प्रवास हाच त्या जिद्दीचा प्रत्यय देणारा आहे.

गडचिरोली : अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील कु. अनन्या अविनाश सामलवार हिने नेमबाजी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर पिस्तोल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात ४०० पैकी ३४२ गुण मिळवत जून महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या अनन्याच्या या यशामुळे आलापल्लीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दुर्गम भागातील विद्यार्थिनीने राष्ट्रीय पातळीवर पोहोचत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अनन्याला त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमीती गाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहल पाटील, सहसचिव श्रुती आमले पाटील, प्राचार्य अरविंद देशमुख तसेच क्रीडा शिक्षक छबुराव काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राची आवड असलेल्या अनन्याने सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळविले. तिची आई गृहिणी असून उच्चशिक्षित आहे, तर वडीलही उच्चशिक्षित आहेत. आजोबा वन विभागात कार्यरत आहेत. मुलीने क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी या उद्देशाने कुटुंबाने दुर्गम आलापल्लीतून संभाजीनगर येथे तिच्या शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली. त्या विश्वासाला अनन्याने आपल्या मेहनतीने सार्थ ठरविले आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली अनन्या आता अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तिच्या यशामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलींमध्येही नेमबाजीसारख्या क्रीडा प्रकारांविषयी नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.