जिद्दीने नियतीलाही हरवले…! रशियातून एमबीबीएस, भारतात एफएमजीई उत्तीर्ण; डॉ. साक्षी मद्दर्लवार यांची प्रेरणादायी भरारी
वडिलांच्या निधनाचा असह्य आघात, परदेशातील संघर्ष आणि अथक परिश्रमांवर मात; गडचिरोलीच्या कन्येने साकारले डॉक्टर होण्याचे स्वप्न...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आलापल्ली : प्रत्येक यशामागे एक संघर्ष दडलेला असतो. काही संघर्ष माणसाला खचवतात, तर काही त्याला अधिक सक्षम बनवतात. गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. साक्षी किशोर मद्दर्लवार यांनी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. रशियातील Privolzhsky Research Medical University, Nizhny Novgorod येथून एमबीबीएसची पदवी संपादन केल्यानंतर भारतातील Foreign Medical Graduate Examination (FMGE) यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी हजारो किलोमीटर दूर रशियात जाणे हेच मोठे आव्हान होते. त्यात परदेशातील भाषा, संस्कृती, कडाक्याची थंडी, वेगळी शिक्षणपद्धती आणि कुटुंबापासून दूर राहण्याचे मानसिक दडपण अशा अनेक अडचणी त्यांच्या वाट्याला आल्या. मात्र, प्रत्येक संकटाला त्यांनी संधी मानले आणि हार न मानता ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली.
लहानपणापासूनच डॉक्टर बनून समाजातील गरजूंची सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी जपले होते. त्यांच्या या स्वप्नावर आई-वडिलांनी आणि भावाने विश्वास ठेवत त्यांना रशियात उच्च शिक्षणासाठी पाठवले. कुटुंबाने दाखविलेला विश्वासच त्यांच्या यशाचा सर्वात मोठा आधार ठरला.
रशियन भाषा शिकणे हे सुरुवातीला सर्वात कठीण आव्हान होते. मात्र सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी केवळ भाषेवर प्रभुत्व मिळवले नाही, तर वैद्यकीय शिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले. विविध देशांतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेताना त्यांना जागतिक आरोग्य व्यवस्थेचा अनुभव, संशोधनाची दृष्टी आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची व्यापक समज मिळाली.
मात्र, त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात आला. वडिलांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या आयुष्याला मोठा धक्का बसला. त्या क्षणी सर्व काही संपल्यासारखे वाटत असतानाही त्यांनी स्वतःला सावरले. अश्रूंना सामर्थ्यात रूपांतरित करत वडिलांनी पाहिलेले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार अधिक बळकट केला. याच जिद्दीने त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले.
एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली एफएमजीई परीक्षा त्यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. आता त्या इंटर्नशिप, वैद्यकीय नोंदणी प्रक्रिया आणि पुढील पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करत असून, भविष्यात ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
डॉ. साक्षी यांचा प्रवास हा केवळ एका विद्यार्थिनीच्या यशाचा नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या जिद्दीचा, कुटुंबाच्या विश्वासाचा आणि स्वप्नांवर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणेचा आदर्श आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश हे “परिस्थिती नाही, तर जिद्दच भविष्य घडवते” याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा; संघर्ष हा यशाचा पाया असतो म्हणूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. परदेशात राहून शिक्षण घेणे, कुटुंबापासून दूर राहणे आणि शिक्षणाच्या काळात वडिलांना गमावणे हे आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण होते. पण प्रत्येक संकटाने मला अधिक मजबूत बनवले. माझी आई, दिवंगत वडील आणि भाऊ यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद होती. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा, सातत्याने मेहनत घ्यावी आणि इतरांशी तुलना न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. कारण आजचा संघर्षच उद्याच्या यशाची पायाभरणी करतो..
डॉ. साक्षी मद्दर्लवार,,,

